
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले. मात्र, या कामात ध्वजखांब रोवला गेला नाही; मंगळवारी (ता. २६) प्रजासत्ताकदिन आहे. त्यामुळे येथे ध्वजारोहण कसे होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत शहरातील अनेक मुख्य चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. तसेच पोस्ट ऑफिसजवळील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरणही करण्यात आले. येथे स्वतंत्रदिन आणि प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण केले जाते; पण सौंदर्यीकरणाच्या कामात येथे ध्वजाराहेणाकरिता खांब रोवण्यात आला नाही. त्यामुळे येथे ध्वजारोहण कुठे होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे १८५७च्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान आहे. त्या इंग्रजांविरुद्ध मोठ्या हिमतीने लढल्या. त्यांचा धाडसीपणा, त्यांचे कार्य कायम स्मरणात राहावे, याकरिता स्थानिक पोस्ट कार्यालय चौकात त्यांचा पुतळा बसविण्यात आला. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनी येथे भारतीय संचार विभागाद्वारे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडत होता.
गत दोन वर्षांपासून शहरात सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले. मात्र, या कामात ध्वजखांब रोवला गेला नाही; तर प्रशासनानेसुद्धा याची दखल न घेतल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी (ता. २६) प्रजासत्ताकदिन आहे. पुतळ्याजवळ ध्वजखांबच नाही. त्यामुळे येथे ध्वजारोहण कसे होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीविरोधात झालेल्या १८५७ च्या स्वातंत्र्य उठावातील अग्रणी सेनानी होत्या. त्यांनी त्या उठावात गाजवलेल्या शौर्यामुळे त्या क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान होऊन गेल्या. ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसीने हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेतला. त्यात झाशी संस्थानही खालसा करण्यात आले.
झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा १३ मार्च १८५४ रोजी काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्या वेळी स्वाभिमानी राणीने ‘माझी झाशी देणार नाही' असे स्फूर्तीदायक उद्गार काढले! झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. त्यामुळे येथील त्यांच्या पुतळ्याजवळ प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण कुठे होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)