लांब चोचीचे गिधाड पाहिलेत काय? चला बोर व्याघ्र प्रकल्पात, नष्टप्राय वर्गवारीत समावेश

रूपेश खैरी
Monday, 25 January 2021

ऐतिहासिक अथवा जुन्या नोंदींनुसार विदर्भ व महाराष्ट्रातील बहुतांश भागात भारतीय गिधाडे आढळायची. सद्यःस्थितीत फारच थोड्या ठिकाणी व कमी संख्येत आढळतात. बोर अभयारण्यात भारतीय गिधाड आढळण्याची ही अलीकडील पहिली नोंद आहे.

वर्धा : लांब चोचीचे गिधाड अथवा भारतीय गिधाड या नावाने ओळखले जाणारे आणि दुर्मीळ नष्टप्राय वर्गवारीत समाविष्ट असलेले गिधाड बोर व्याघ्र प्रकल्पात आढळून आल्याने वन्यप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर ही महत्त्वाची नोंद बहार नेचर फाउंडेशनचे पक्षीअभ्यासक दिलीप विरखडे यांनी जंगल सफारीदरम्यान केली आहे.

बोर धरणाच्या मागील बाजूस रानडुकरांचा एक कळप मृत नीलगायीचे मांस भक्षण करीत असताना त्यांच्या बाजूलाच एक लांब चोचीचे गिधाडदेखील मांस भक्षण करताना वीरखडे यांना आढळून आले. या वेळेस त्यांच्यासह प्राजक्ता विरखडे, पार्थ विरखडे, गाईड शुभम पाटील आणि जिप्सीचालक सारंग वानखेडे उपस्थित होते.

जाणून घ्या -  यवतमाळकरांची चिंता वाढली! मोराचा अहवाल पॉझिटिव्ह...

लांब चोचीच्या गिधाडाचे सामान्य नाव ‘इंडियन लाँगबिल्ड वल्चर’ असून शास्त्रीय नाव जिप्स इंडिकस असे आहे. इतर गिधाडांप्रमाणे हे मृतभक्षक असून या पक्ष्याचा आकार सामान्यतः ८० ते १०३ सेंटिमीटर लांब असतो. या गिधाडाच्या मानेवर ठळक उठून दिसणारा पांढरा गळपट्टा असून डोक्‍यावर व मानेवर पिसे नसतात. त्याचे शरीर आणि पाठीच्या वरच्या भागातील पिसे फिकट राखाडी रंगाची असतात. पाठीच्या खालच्या भागातील पिसे आणि शेपटी जास्त गडद असते. नजर अतिशय तीक्ष्ण असल्यामुळे अतिशय उंचावरूनही ते आपले खाद्य सहज शोधतात.

१९९०च्या दशकापर्यंत भारतीय गिधाड व इतर गिधाड प्रजाती मोठ्या प्रमाणात आढळायच्या. पूर्वी जनावरांच्या उपचारात डायक्‍लोफिनॅक हे औषध वापरले जायचे. ही जनावरे मृत झाल्यावर त्यांचे मांस भक्षण केल्यामुळे गिधाडेही मोठ्या संख्येने मरण पावली आणि त्यांची संख्या झपाट्याने कमी होत गेली. गिधाडांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे २००२ साली या गिधाडांचा समावेश आययूसीएन म्हणजेच आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या यादीत अतिशय चिंताजनक प्रजाती (क्रिटिकली एन्डेंजर्ड) म्हणून सूचीबद्ध केलेले आहे.
 

गिधाड आढळल्याची पहिलीच नोंद

ऐतिहासिक अथवा जुन्या नोंदींनुसार विदर्भ व महाराष्ट्रातील बहुतांश भागात भारतीय गिधाडे आढळायची. सद्यःस्थितीत फारच थोड्या ठिकाणी व कमी संख्येत आढळतात. बहार नेचर फाउंडेशनने २०१५ साली वर्धा जिल्ह्याची पक्षीसूची प्रकाशित केली. त्या सूचीमध्ये या गिधाडासह अन्य तीन प्रजातींचा समावेश आहे. बोर अभयारण्यात भारतीय गिधाड आढळण्याची ही अलीकडील पहिली नोंद आहे. या नोंदीमुळे व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता समृद्ध असल्याचे अधोरेखित झाले आहे.

संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना
बोर व्याघ्र प्रकल्पात पक्षीअभ्यासक दिलीप विरखडे यांना भारतीय गिधाड आढळून आले, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. हे गिधाड कायमस्वरूपी वास्तव्यास आहे किंवा भ्रमंतीदरम्यान थोडा विसावा घेण्याकरिता बोरमध्ये थांबले, याचा अभ्यास करण्यात येईल. या गिधाडाचे घरटे वनक्षेत्रात असल्यास त्याचा शोध घेऊन संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येईल.
- नीलेश गावंडे
वनपरिक्षेत्राधिकारी, बोर व्याघ्र प्रकल्प.

हेही वाचा - सत्ता आमची, लोकार्पण आम्हीच करू; पालिका इमारतीच्या उद्घटनावरून महाविकास आघाडी अन् भाजप आमनसामने

निसर्गातील स्वच्छतादूत
गिधाड हा पक्षी निसर्गातील स्वच्छतादूत असून पूर्वी गावाच्या वेशीवर मृत प्राण्यांचे मांस भक्षण करताना समूहाने दिसून यायचा. भारतीय महाकाव्यातही गिद्ध कुळातील या पक्ष्याचा जटायू म्हणून उल्लेख आहे. मात्र, अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा असलेल्या या पक्ष्याचे अस्तित्वच आज मानवी चुकांमुळे धोक्‍यात आले आहे. भारतीय गिधाडाची नव्याने झालेली ही नोंद दिलासा देणारी असून त्यांच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- संजय इंगळे तिगावकर
मानद वन्यजीव रक्षक, वर्धा.

पहिल्यांदाच गिधाड पाहिले
बोर व्याघ्र प्रकल्पात मला भारतीय गिधाड पाहावयास मिळाले, याचा खूपच आनंद झाला. विविध पक्ष्यांसोबतच आज पहिल्यांदाच गिधाडही पाहायला मिळाले, हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.
- पार्थ विरखडे, पक्षीनिरीक्षक

(संपादन - दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Long-billed vulture found in Bor Tiger Project