नागरिकांनो सतर्क राहा! विदर्भात पुन्हा पूर येण्याची शक्यता; 12 तासांत अरुणावती धरण भरल्यास दरवाजे उघडणार

सुनील हिरास 
Friday, 11 September 2020

अरुणावती धरणात 29 ऑगस्टपर्यंत 78 टक्के जलसाठा होता. म्हणून धरणाचे दरवाजे उघडण्यात आले नव्हते. मात्र, आता दोन दिवसांपासून दिग्रस शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या धावंडाचे नदीपात्र संततधार व मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहू लागले.

दिग्रस (जि. यवतमाळ) : दिग्रस शहरासह ग्रामीण भागात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने दोन वर्षांपासून एकही पूर न गेलेल्या धावंडा नदीला पूर आला. ऑगस्टमध्ये अरुणावती धरणात 80 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असलेला जलसाठा आता दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने 97 टक्के झाला आहे. त्यामुळे अरुणावती धरण व नदीकाठावरील दिग्रस व आर्णी तालुक्‍यांतील 16 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अरुणावती धरणात 29 ऑगस्टपर्यंत 78 टक्के जलसाठा होता. म्हणून धरणाचे दरवाजे उघडण्यात आले नव्हते. मात्र, आता दोन दिवसांपासून दिग्रस शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या धावंडाचे नदीपात्र संततधार व मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहू लागले. धावंडा नदीचे पाणी शहरापासून अवघ्या आठ किलोमीटरवरील अरुणावती धरणात जमा होत असल्याने धरणात शुक्रवारी (ता.11) सायंकाळी पाचपर्यंत 97 टक्के जलसाठा झाला. 

हेही वाचा - वीज ग्राहकांनो लक्ष द्या! अचूक वीजबिल हवंय? मग ५ दिवसांच्या आत हे कराच.. अन्यथा..

मात्र, तूर्तास धरणाचा एकही दरवाजा उघडला नसून, जर पावसाने जोरदार हजेरी लावली व धरण 100 टक्के भरल्यास धरणाचे दरवाजे उघडावे लागतील. त्यामुळे धरण व नदीकाठावरील 16 गावांना सतर्कतेचा इशारा अरुणावती पाटबंधारे विभाग व तहसील प्रशासनाने दिला आहे.

नदीकाठावरील इशारा दिलेली गावे

अरुणावती धरणात धावंडा नदीतून जलासाठ्याची आवक सुरूच आहे. येत्या काही तासांत जोरदार पाऊस झाल्यास व धरण 100 टक्के भरल्यास अरुणावती धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. त्यामुळे दिग्रस तालुक्‍यातील चिरकुटा, सावंगा खुर्द, बेलुरा, मेंढी, लोणी, लिंगी, सायखेडा, चिकणी, भंडारी, आर्णी, आसरा, विठोली, येरमल, शिऊर, पळशी या 15 गावांतील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अरुणावती प्रकल्पात कोणत्याही क्षणी जलसाठ्यात वाढ होऊ शकते म्हणून कोणीही मासेमारीसाठी धरणात उतरू नये. नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित गावांतील पोलिस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहायकांनी सतर्क राहावे व नागरिकांना सूचना द्याव्यात.
- राजेश वजिरे, 
तहसीलदार, दिग्रस.

अधिक माहितीसाठी - कुंभ मेळा संपल्यानंतर नागा साधू कोठे जातात? 

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात 97 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. अद्यापही धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे अरुणावती नदीकाठावरील गावांतील ग्रामस्थांना नदीकाठी जनावरे चरण्यासाठी नेऊ नयेत, जोरदार पाऊस आल्यास येत्या 12 तासांत जलसाठ्यात वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
- केतन अक्कुलवार, 
अभियंता, अरुणावती पाटबंधारे विभाग, दिग्रस.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood conditions may come across vidarbha region and yavatma district