भयंकर! पर्लकोटाने पुन्हा धारण केले भयानक रूप.. गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल १०० गावांचा तुटला संपर्क

लीलाधर कसारे 
Sunday, 16 August 2020

मागील चार-पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने मध्यरात्रीपासून पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले. हे पाणी भामरागडच्या बाजारपेठेत शिरल्याने नागरिक आणि दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

भामराड (जि. गडचिरोली) : यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पर्लकोटा नदीला पूर आला असून पुराचे पाणी भामरागड येथे शिरले आहे. त्यामुळे अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली असून या परिसरातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडमधील सुमारे 50 कुटुंबांनी आपला जीव वाचवत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे.

मागील चार-पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने मध्यरात्रीपासून पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले. हे पाणी भामरागडच्या बाजारपेठेत शिरल्याने नागरिक आणि दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय भामरागड तालुक्‍यातील जुव्वी आणि कुमरगुडा नाल्यालाही पूर आला आहे. यामुळे शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. पोलिस जवान आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन विभागाने तेथे मदत कार्य सुरू केले आहे. इंद्रावती व गोदावरी या नद्याही दुथडी भरून वाहत आहेत.

हेही वाचा - अरे देवा! वडीलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेला अन् डॉक्टरांनी दिले डेथ सर्टीफिकेट

पुराचे पाणी शहरात शिरले

तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने सिरोंचा तालुक्‍याच्या सीमेवरील अंकिसा, असरअली परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरस्थिती नियंत्रणात असल्याचे असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ झाली असून पुराचे पाणी शहरात शिरले आहे. त्यामुळे अनेक दुकाने व घरे पाण्याखाली आली आहेत. मध्यरात्री 3 वाजताच्या दरम्यान पुराचे पाणी शहरात शिरायला सुरुवात झाल्याने प्रशासन आणि नागरिकांची प्रचंड धावपळ झाली. 

मागील वर्षीही आला होता पूर 

आता पोलिस व महसूल प्रशासनाने रेस्क्‍यू ऑपरेशनला सुरुवात केली आहे. शहरात वेगाने पुराचे पाणी शिरत असल्याने अनेक लोक घरात अडकून असल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्‍यू बोटच्या साहाय्याने भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी या रेस्क्‍यू ऑपरेशनसाठी स्वत: सक्रिय आहेत. या वर्षी पहिल्यांदाच पर्लकोटा नदीला पूर आला आहे. मागील वर्षी पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड शहर 70 टक्‍के पाण्याखाली आले होते. त्यामुळे कोल्हापूर, सांगलीला आलेल्या महापूरानंतर गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडला आलेल्या पुराने विशेष लक्ष वेधले होते. 

जाणून घ्या - Video : खासदार नवनीत राणा म्हणाल्या खूप वेदना झाल्या पण मी मरता मरता वाचली, कारण...

अतिरिक्त रेस्क्‍यू बोट्‌स मागवल्या

तसेच मागील वर्षी येथे सातवेळा पूर आला होता. जिल्हा प्रशासनाने मागील वर्षी आलेल्या पुराच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी विशेष खबरदारी घेतली आहे. महसूल विभागाने विशेष रणनीती तयार केली आहे. अतिरिक्त रेस्क्‍यू बोट्‌स मागवल्या आहेत, तर रेस्क्‍यू केलेल्या लोकांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा संपूर्ण भाग घनदाट जंगल आणि दुर्गम असल्याने दूरध्वनी सेवा नेहमी खंडित होत असते. त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थिती कुठेही अडथळा निर्माण होऊ नये या कारणाने विशेष सॅटेलाइट मोबाईल महसूल विभागाकडे देण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य नियोजन केल्याचे दिसून येत आहे.

अनेक मार्ग बंद

जिल्ह्याच्या अनेक भागांतील पुलांवरून पुराचे पाणी जात असल्याने या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. दोन दिवसांपासून छत्तीसगड राज्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वाहतुकीसाठी बंद आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील दुर्गम भागांतील गावात जाणाऱ्या मार्गांवरील नाल्यांवर पूल नसल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत.

 

संपादन - अथर्व महांकाळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood in gadchiroli district in parlkota river read full story