हृदयद्रावक! त्या दोन जीवलग मित्रांची मैत्री सरणारवरही कायम...

तुषार अतकारे
शनिवार, 11 जुलै 2020

गुण्यागोविंदाने राहणारं हजार-बाराशे लोकवस्तीचं वणी तालुक्‍यातील डोर्ली हे इवलसं गाव. गावात अर्थातचं कृषीप्रधान संस्कृती. शेतीवर जगणारं हे गाव. शेती करणारे शेतकरी आणि शेतीत मजुरीला जाणारे मजूर, अशा श्रमसंस्कृतीच्या या गावावर जणू कहरच बरसला. तेही एक दोघांवर नव्हे तर तिघांवर. नियतीही अशी क्रूर की होत्याचे नव्हते करून टाकले.

वणी (जि. यवतमाळ) : डोर्ली गावात गुण्या गोविंदाने राहात असलेल्या मजुरांवर नियतीने डाव साधला. त्यांना त्यांच्या स्वकीयांपासून हिरावून नेले. समाजमन सुन्न करणारी ही घटना. एकाच दिवशी तिघांची अत्यंयात्रा बघताना अक्‍खे गाव शोकसागरात बुडाले. शोकग्रस्त गावात त्या दिवशी चुली पेटल्याच नाहीत. सारेच उपाशी निजले.

डोर्ली या गावात जसे शेतकरी राहतात, तसे मजुरही. परिस्थिती अत्यंत हलाखीची. दारिद्रयाचे चटके सहन करीत मिळेल ते काम करीत आपल्या कुटुंबाचा गाडा ते हाकतात. "मजुरांचे गाव' म्हणूनच पंचक्रोशीत डोर्ली या गावाची ओळख झालेली. श्रमशक्तीवर विश्‍वास असलेले हे गाव. बुधवारी शिवारातील एका शेतातील कामे आटोपून गावाकडे परतीचा प्रवास बैलबंडीने सुरू असताना नाल्यातून पाण्याचा जोरदार प्रवाह आला. बैलबंडी चालकाचा जरासा अंदाज चुकला आणि पाण्याचा हा भयंकल लोंढा होत्याचे नव्हते करून गेला. काही समजण्यापूर्वीच अचानक बैलबंडी नाल्यात उलटली. या अत्यंत दुर्दैवी घटनेत विनायक उपरे, हरिदास खाडे व मीना कुडमेथे यांना जलसमाधी मिळाली. ही वार्ता गावात हा हा म्हणता पोहोचली.

हेही वाचा - बीफार्म पदवीधर युवकाने केली कोरफडीची शेती अन् झाला लघुउद्योगाचा मालक...बेरोजगारांना दिला रोजगार

शहारे आणणारे दृश्‍य
गावात वार्ता पोहोचताच हाहाकार माजला. शेत शिवारात लगबगीचे दिवस असल्याने सध्या निंदनाची कामे जोरात सुरू आहेत. मजुरीचे दिवस असताना आणी दिवसभर शेतकामावर मजुर जात असताना डोर्ली गावात ही घटना घडल्याने अनेकांच्या मनात धडकी बसली. बहुदा हा या गावातील पहिलाच दुर्दैवी प्रसंग असावा. डोर्लीत एकाच दिवशी तीन जणांची अंत्ययात्रा निघाली. हे दृश्‍य अंगावर शहारे आणणारेच होते. निःशब्द झालेली मने व पाणावलेले डोळे अश्रूंना वाट मोकळी करुन देत होते.

अधिक माहितीसाठी - महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

संपूर्ण गावात स्मशान शांतता
क्रूर नियतीने एकाच वेळी चौघांचे प्राण हिसकावून घेतले. परंतु मित्र असलेले विनायक उपरे आणि हरिदास खाडे यांना एकाच चितेवर मुखाग्नी देत गावकाऱ्यांनी त्यांची मैत्री अखेरपर्यंत घट्ट ठेवली. त्यांच्या मैत्रीला लोक त्यांच्या डोळ्यातून ढळाढळा वाहणाऱ्या अश्रूंनी जणू अर्ध्य देत होते. काळाने अचानक झेप घेतल्याने उपरे, खाडे, कुडमेथे कुटुंबावर मोठा आघात केला. "आता केवळ उरल्या आठवणी' म्हणत संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरली आहे.

संपादन - प्रमोद काळबांडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood killed three farm labours