esakal | बीफार्म पदवीधर युवकाने केली कोरफडीची शेती अन्‌ झाला लघुउद्योगाचा मालक...बेरोजगारांना दिला रोजगार
sakal

बोलून बातमी शोधा

लाखांदूर : तरुणाने केलेली कोरफडीची शेती.

वाढत्या स्पर्धेत हल्ली नोकरी टिकवणे मोठे मुश्‍कील काम झाले आहे. नवनवी आव्हाने पेलत शेतीच करण्याकडे अनेक तरुणांचा कल आहे. लाखांदूर तालुक्‍यातील एका उच्छशिक्षत युवकाने नोकरी सोडून इच्छाशक्तीच्या जोरावर शेती केली आहे. त्या शेतीतून कोरफडीचे उत्पादन घेऊन त्यावर आधारित घृतिका ऍग्रो सियुटीकल्स हा प्रक्रिया लघुउद्योग त्याने साकारला आहे. सध्या या लघुउद्योगातून गावातील 10 ते 15 बेरोजगार महिला व पुरुषांना रोजगार मिळाला आहे.

बीफार्म पदवीधर युवकाने केली कोरफडीची शेती अन्‌ झाला लघुउद्योगाचा मालक...बेरोजगारांना दिला रोजगार

sakal_logo
By
विश्‍वपाल हजारे

लाखांदूर (जि. भंडारा) : तालुक्‍यातील रोहणी हे लहानसे गाव आहे. येथील शेतकरी धानासह इतर पिकांची पारंपरिक पद्धतीने शेती करतात. पावसाची अनियमितता, रोगराई ही समस्या पाचवीला पुजलेलीच आहे. परंतु, औषधीनिर्माण शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या (बीफार्म) एका होतकरू तरुणाने एक धाडस केले. नामांकित कंपनीतील लठ्ठ पगाराच्या चांगल्या नोकरीवर पाणी सोडले.

स्वतःच्या शेतात कोरफडीची (ऍलोव्हेरा) लागवड केली. त्यावर आधारित प्रक्रिया करणारा लघुउद्योगही उभारला. आज तो स्वतः एका लघुउद्योगाचा मालक असून या माध्यमातून त्याने गावातील पंधरा ते वीस बेरोजगारांना रोजगार दिला आहे.

आधी औषध निर्मात्याची केली नोकरी

रोहणी येथील खेमराज हरिश्‍चंद्र भुते (वय 36) उच्चशिक्षित युवक आता शेतकरी व लघुउद्योजक म्हणून परिसरात नावारूपास आला आहे. औषधशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या खेमराजने सुरुवातीला काही काळ गोवा येथील सिपला नामक कंपनीत औषध निर्मात्याची नोकरीसुद्धा केली होती. परंतु, शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मातीची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. घरी 9 ते 10 एकर शेती आहे.

नोकरीवर सोडले पाणी

वडील शेतीसह बाजार समितीत धान अडत्या म्हणून काम करतात. पारंपरिक धान शेती करूनही पुरेसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे खासगी कंपनीत नोकर म्हणून काम करण्यापेक्षा केव्हाही स्वतः प्रायोगिक शेती करून उद्योगनिर्मिती करण्याची कल्पना त्याच्या डोक्‍यात आली. त्याने नोकरी सोडून आपल्या गावातील बेरोजगार व्यक्तींना काम व इतर शेतकऱ्यांनासुद्धा प्रेरणा मिळेल, या हेतूने कोरफडीची शेती केली. त्यातून भरघोस उत्पादन घेऊन गावातील बरोजगारांना रोजगारही मिळवून दिला.

लाखोंची उलाढाल

शेतीवर आधारित उद्योग व व्यवसाय उभारून रोजागारनिर्मितीचे ध्येय ठेवलेल्या खेमराजने तीन वर्षांपूर्वी शेतात कोरफड या औषधी वनस्पतीची लागवड केली. प्रारंभिक काळात त्याला अनेक अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागले. पण तो डगमगला नाही की खचला नाही. आज त्याच्या या निर्धार व परिश्रमाची फलश्रुती अशी की तो एका कंपनीचा मालक आहे. कोरफडीचे उत्पादन घेऊन त्यावर आधारित घृतिका ऍग्रो सियुटीकल्स हा प्रक्रिया लघुउद्योग त्याने साकारला.

सध्या या लघुउद्योगातून गावातील 10 ते 15 बेरोजगार महिला व पुरुष यांना रोजगार मिळाला आहे. औषध कंपनीत चाळीस हजार रुपये महिना कमावणारा खेमराज आज वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करतो. विशेषतः पोटाचे विकार, सौंदर्यप्रसाधने व अन्न, औषध द्रव्यात कोरफडीला मागणी असल्याने देशविदेशातसुद्धा निर्यात सुरू आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषिपूरक उद्योगातून बेरोजगारीवर मात करीत आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने खेमराज याने स्वीकारलेला मार्ग इतरांसाठी मार्गदर्शक व अनुकरणीय ठरणारा आहे, यात शंका नाही.

असं घडलंच कसं : शेतकरीही झाले टेक्‍नोसॅव्ही! ऍपच्या माध्यमातून ई-पीकपाहणी
 


अनेक जण शेती व प्रकल्पाला भेट देतात
नोकरीत असतानाच कोरफडीची लागवड, उत्पादनावर आधारित प्रक्रियाउद्योग या सर्व गोष्टीची संपूर्ण माहिती घेऊन अभ्यास केला. नोकरी सोडून शेती करण्याचा त्याचा हा निर्णय अनेकांना तेव्हा चुकीचा वाटला. अनेकांनी नावेही ठेवली. आज अनेक जण माझी शेती व प्रकल्प पाहण्यासाठी येतात, कौतुक करतात.
- खेमराज भुते, युवा शेतकरी तथा उद्योजक.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)