भामरागडला चौथ्यांदा पुराचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

गडचिरोली : पश्‍चिम महाराष्ट्रापाठोपाठ विदर्भातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यालादेखील पुराचा फटका बसला आहे. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील लाखो नागरिक महापुराचा सामना करत असताना त्यांच्या मदतीसाठी शासन-प्रशासन एकवटले आहेत. तर दुसरीकडे विदर्भातील भागरागडच्या पुराची कुठे साधी चर्चाही नाही. गत 15 दिवसांत तब्बल चौथ्यांदा भामरागडला पुराचा फटका बसला आहे. नागरिकांच्या घरादारासह दुकानांमध्ये पाणी शिरले असून शेतीसुद्धा जलमय झाली आहे.

जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता, खोब्रागडी, पर्लकोटा, सती, कठाणी, वैलोचणा तसेच सती आदी प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यात धरणाच्या पाण्याची भर पडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील चारशेवर गावांचा संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा बंद असून भ्रमध्वनीसेवाही प्रभावित झाली आहे.
जिल्ह्यात आजवर दोनशे कुटुंबांना पुराचा फटका बसला असून अनेक नागरिकांची घरे तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भामरागड येथे 15 दिवसांत चारदा पूरपरिस्थिती उद्‌भवली. गडचिरोली शहरदेखील 15 दिवसांत दोनदा जलमय झाले. हीच परिस्थिती एटापल्ली, अहेरी, मुलचेरा, कुरखेडा, धानोरा, आरमोरी तालुक्‍यात उद्‌भवली. जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ओल्या दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. शेतातील बांधात साचलेल्या पाण्यामुळे धान पऱ्हे सडण्याच्या मार्गावर आहेत.
दोघांचा मृत्यू
अतिवृष्टीमुळे दीडशे घरांचे नुकसान झाले असून दोन व्यक्तींसह आठ जनावरांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. पूल आणि रस्त्यांचे जवळपास 10 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 1127.06 मिमी. पाऊस पडला असून त्याची टक्केवारा 83.24 एवढी आहे.
11 नागरिकांना वाचवण्यात यश
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व पोलिस यंत्रणेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या 15 दिवसांत पुरात सापडलेल्या 11 नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश आले. पूरग्रस्तांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरू असून आवश्‍यक ठिकाणी मोटर बोट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood water enters in bhamragarh fourth time