अन्न, पाण्याचे नमुने पाठवले प्रयोगशाळेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

भंडारा : आदिवासी विभागाच्या क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या मुलांना शनिवारी मळमळ, डोकेदुखीचा त्रास झाला. त्यामुळे डॉक्‍टरांच्या चमूकडून त्यांची तपासणी करण्यात आली असून, सर्वांची प्रकृती सुधारली आहे. याबाबत आरोग्य विभाग तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने अन्न, पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिली.

रविवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांच्या कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आदिवासी विभागाच्या क्रीडा स्पर्धेसाठी भामरागड, गडचिरोली, अहेरी, देवरी, चिमूर, नागपूर, भंडारा व चंद्रपूर या आठ प्रकल्पांतील 2,700 विद्यार्थी आणि शिक्षक असे तीन हजारांहून अधिक लोक येथे आले आहेत. काही मुलांना शनिवारी सायंकाळी मळमळ व डोकेदुखीचा त्रास झाला. त्यांना आरोग्य समिती सदस्यांनी उपचार दिले. परंतु, संख्या वाढल्यामुळे त्यांना वाहनांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. 193 जणांनी उपचार घेतले. त्यापैकी 21 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळपर्यंत त्यातील 16 जणांना सुटी देण्यात आली आहे. सहा जणांवर उपचार सुरू आहेत.
या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या ठिकाणी येण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागला आहे. मुलांना आरोग्याचा त्रास झाला. त्यामुळे विभागाने कोणतीही शक्‍यता नाकारली नाही. आज, अन्न व पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविलेले आहेत. त्याचा अहवाल आल्यावर अधिक माहिती मिळू शकेल, असेही ते म्हणाले.
येथे आलेल्या मुलामुलींच्या राहण्याची व्यवस्था महर्षी विद्यामंदिर, क्रीडा संकुल, संतकृपा लॉन व पोलिस वसाहत येथे केली आहे. त्यांना पिण्याचे पाणी, अन्न व इतर बाबींकडे विभाग काटेकोरपणे लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उईके उपस्थित होते.

Web Title: food and water sample collected