वनविभागाचे रेस्क्‍यू ऑपरेशन फसले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

भंडारा - लाखनी तालुक्‍यातील रेंगेपार कोठा येथे गावतलावानजीक वासराची शिकार करून बिबट पाइपात दडी मारून बसला. पाइपाच्या तोंडाशी गावकऱ्यांनी आग लावल्याने बिबटाचा धुरामुळे श्‍वास गुदमरून मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना बुधवारी (ता. 26) दुपारी घडली. 

भंडारा - लाखनी तालुक्‍यातील रेंगेपार कोठा येथे गावतलावानजीक वासराची शिकार करून बिबट पाइपात दडी मारून बसला. पाइपाच्या तोंडाशी गावकऱ्यांनी आग लावल्याने बिबटाचा धुरामुळे श्‍वास गुदमरून मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना बुधवारी (ता. 26) दुपारी घडली. 

बिबटाला गावातून हुसकावून लावण्यासाठी रेस्क्‍यू ऑपरेशन राबविणाऱ्या वनविभागाचा गलथानपणा व नियोजनशून्य कारभार उघडकीस आला आहे. हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळल्या गेल्यास बिबटाचा जीव वाचू शकला असता अशी चर्चा आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तहानलेला बिबट रेंगेपार कोठा येथील तलावावर आला. शेजारी चरत असलेल्या वासराचा त्याने फडशा पाडला. शेतावरील मजुरांनी आरडाओरड केल्याने भेदरलेल्या बिबट्याने नाल्यालगतच्या सिमेंट पाइपमध्ये दडी मारली. या घटनेची माहिती मिळताच शेकडो गावकरी घटनास्थळी जमले. बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी या गावकऱ्यांनी विचित्र शक्कल लढविली. पाइपाच्या दोन्ही बाजूंना आग लावली. धुरामुळे श्‍वास कोंडल्याने बिबट बेशुद्ध पडला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्याने वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. परंतु, पोलिसांना सूचना न केल्यामुळे घटनास्थळी झालेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे अशक्‍य झाले. 

वनविभागाच्या चमूने पोहोचताच बिबट्याला बाहेर काढले. त्याच्यावर पाणी शिंपडताच तो शुद्धीवर येऊन त्याने वनकर्मचाऱ्यांसह नागरिकांवर हल्ला केला. त्यामुळे बिबट्याला लाठ्याकाठ्यांनी दाबून त्याचे हातपाय बांधण्यात आले. गळ्याला दुपट्टा बांधण्यात आला. त्याची नैसर्गिक हालचाल बंद पडल्याने अर्धमेला झालेल्या बिबटाचा मृत्यू झाला. या घटनेत वनविभागाचे नियोजन चुकले. पोलिसांची कुमक बोलावून लोकांची गर्दी हटवून बिबट्याला हुसकावून लावता आले असते. परंतु, त्यांच्याकडून झालेली चूक बिबट्याच्या जिवावर बेतली. 

इन कॅमेरा शवविच्छेदन 
मृत बिबटावर गडेगाव लाकूड आगारात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. धुरामुळे श्‍वास कोंडल्याने तसेच प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांनी सकाळशी बोलताना दिली. हे रेस्क्‍यू ऑपरेशन राबविताना प्रथम बिबट्याचा जीव वाचविण्याला वनविभागाने प्राधान्य द्यायला पाहिजे होते. बिबटाला बाहेर काढल्यानंतर त्याला बांधण्याऐवजी त्याच्यावर जाळे टाकणे अधिक उपयुक्त ठरले असते. प्राणवायू मिळून नैसर्गिक हालचाल सुरू असल्याने कदाचित तो वाचू शकला असता, असेही ते म्हणाले.

Web Title: The forest department's rescue operation

टॅग्स