
नवीन वर्षात महाराष्ट्र तसेच देशावरील संकटे दूर व्हावीत, शेतकऱ्यांच्या समस्या कमी व्हाव्यात आणि त्यांचे जीवन समाधानाचे जावो हीच अपेक्षा आहे.
अमरावती ः शेतकऱ्यांचे नवीन वर्ष सुखासमाधानाचे जावे तसेच नवीन वर्षात राज्यातील सरकारला चांगली कामे करण्याची सुबुद्धी ईश्वराने द्यावी, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.३१) महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.
हेही वाचा- ब्रेकिंग! सीबीआयची नागपुरात कारवाई; लाच घेणारा सहायक कामगार आयुक्त जाळ्यात
एका कार्यक्रमानिमित्त श्री. फडणवीस अमरावतीला आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, की नवीन वर्षाला माझे स्वतःचे असे काही वेगळे संकल्प नाहीत. नवीन वर्षात महाराष्ट्र तसेच देशावरील संकटे दूर व्हावीत, शेतकऱ्यांच्या समस्या कमी व्हाव्यात आणि त्यांचे जीवन समाधानाचे जावो हीच अपेक्षा आहे.
आपण मुख्यमंत्री असताना पुणे महापालिकेला पाणीपुरवठा योजनेसाठी निधी दिला होता. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून उद्या आयोजित कार्यक्रमात आपण स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एका व्यासपीठावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडच्या काळात संकुचित वृत्ती वाढलेली दिसून येते. कुणी आमदार किंवा पदाधिकारी दुसऱ्या पक्षातील लोकांना भेटले तर तो त्या पक्षात जाणार, अशा वावड्या लगेच उठविल्या जातात. ही संकुचित प्रवृत्ती सोडणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
जाणून घ्या - शेतकऱ्यांसाठी सरते वर्ष गेले आर्थिक नुकसानीचे; अती पाऊस, कीडरोगांच्या आक्रमणाने उत्पादनाची सरासरी...
फडणवीस म्हणाले, ज्या प्रकारचा सरकारचा कारभार सुरू आहे. त्याला ते वैतागले होते. डीजींना कुठेही विश्वासात न घेता कामे सुरू आहेत. राज्य सरकारने समजून घेतले पाहिजे की, पोलिसींग हा स्वतंत्र विभाग आहे. गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत हा विभाग येत असला तरी आपण त्या विभागाला स्वायत्तता दिली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं या विभागाच्या बाबतीतलं काम हे पर्यवेक्षकीय पद्धतीचं असतं. पण सद्यःस्थितीत छोट्यातल्या छोट्या बदल्यांपासून सर्वंच कामांमध्ये सरकारचा हस्तक्षेप सुरू आहे. त्यामुळेच डीजी सुबोधकुमार जयस्वाल यांनी असा निर्णय घेतला असावा.
संपादन - अथर्व महांकाळ