शेतकऱ्यांसाठी सरते वर्ष गेले आर्थिक नुकसानीचे; अती पाऊस, कीडरोगांच्या आक्रमणाने उत्पादनाची सरासरी घसरली

कृष्णा लोखंडे 
Thursday, 31 December 2020

नव्या आशा व स्वप्न घेऊन उजाडलेले वर्ष 2020 कोरोना संक्रमणाच्या छायेत सरले. या साथरोगाच्या संक्रमणाने सर्वच व्यवहार ठप्प केले तसे ते शेतकऱ्यांनाही वाईटच गेले.

अमरावती ः सरते वर्ष शेतकऱ्यांसाठी नुकासानदेह ठरले. मार्चपासून कोरोना साथरोगाचे संक्रमण, नंतर पावसाने घातलेला धुमाकूळ व कीडरोगांचे आक्रमण यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनाची सरासरी व प्रतवारी घसरल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. खुल्या बाजारात सोयाबीनला हमीदराच्या बरोबरीने भाव मिळत असला तरी कापसाच्या दरातील घसरण चिंता वाढवणारी ठरली. याच वर्षात 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले.

नव्या आशा व स्वप्न घेऊन उजाडलेले वर्ष 2020 कोरोना संक्रमणाच्या छायेत सरले. या साथरोगाच्या संक्रमणाने सर्वच व्यवहार ठप्प केले तसे ते शेतकऱ्यांनाही वाईटच गेले. संसर्गाच्या भीतीने ऐन मशागतीच्या व पेरणीच्या हंगामात शेतमजुरांची वानवा यामुळे हंगामाची सुरुवातच रडत रखडत झाली. शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी आटोपली तर पावसाने धुमाकूळ घातला. यंदा पाऊसमान चांगले राहील, असे अंदाज वर्तविण्यात आले ते चुकीचे ठरलेत. 

हेही वाचा - Look Back 2020 : विदर्भात १,१४९ शेतकऱ्यांनी आवळला...

प्रारंभी संतुलित होत असलेला पाऊस नंतर अतिप्रमाणात झाला. त्याचा परिणाम थेट उगवलेल्या मूग, उडीद व सोयाबीन पिकावर झाला. मूग व उडीद पूर्णतः हातचा गेला. मुगाची सरासरी उत्पादकता हेक्‍टरी एक ते दीड क्विंटलवर आली तर उडीद 24 किलोवर आला. त्यामुळे ही दोन्ही पिके हातातून गेली. सोयाबीनलाही अतिपावसाचा जोरदार फटका बसला. पिकांवर पावसासोबतच आलेल्या कीडरोगांच्या आक्रमणाने शेतकरी त्रस्त झाला. 

फवारणी करून थकलेल्या शेतकऱ्याने उत्पादनाची आशा सोडली व अनेकांनी पिके उपटून टाकली. जिल्ह्यातील 41 हजार हेक्‍टर क्षेत्रातील सोयाबीन पूर्णतः वाया गेले. तर निम्म्याहून अधिक तालुक्‍यातील उत्पादकता हेक्‍टरी बारा क्विंटलपर्यंत घसरली. कापसावर यंदा गुलाबी बोंडअळीपेक्षा बोडसर या नव्या रोगाने आक्रमण करून पीकच हिसकावून घेतले. कापसाचीही उत्पादकता घसरण्यासोबत प्रत खालावली. त्याचा परिणाम बाजारात किंमत मिळण्यावर पडला आहे. शासकीय केंद्रांवर एफअेक्‍यू दर्जाच्या कापसालाच हमीदर दिल्या जात असून एलअेआर व त्यापेक्षा कमी दर्जाचा कापूस नाकारल्या जात आहे. खुल्या बाजारात 5200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

नक्की वाचा - काँग्रेसमधील गटबाजी संपता संपेना; पराभव निश्चित तरी महापौरपदासाठी दोघांनी भरले अर्ज

वर्ष 2020 मधील खरीप हंगामातील पिकांची वाताहत होतानाच या वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढल्या. शासकीय आकडेवारीनुसार या वर्षात तब्बल 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील बहूतांश शेतकरी खरीप हंगामातील आहेत. शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब या वर्षात राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी ठरली. पाच वर्षात पहिल्यांदा कर्जमाफीचा आलेख उंचावला. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळू शकले.

संपदान - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Look Back 2020 difficult year for farmers full of problems