अखेर माजी आमदार अशोक धवड यांना अटक

अखेर माजी आमदार अशोक धवड यांना अटक

नागपूर : नवोदय बॅंकेत बोगस कागदपत्रांद्वारे कर्ज दिल्याचे दाखवून कोट्यवधींचा घोटाळा करणारे नवोदय बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि माजी आमदार अशोक धवड यांना अखेर गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014-2015 या कालावधीत हा घोटाळा करण्यात आला. त्यावेळी अशोक धवड हे बॅंकेचे अध्यक्ष होते. धवड यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कर्जदारांना नियमबाह्य रीतीने कर्ज दिले. ज्या कर्जदारांनी बॅंकेकडून कर्ज घेताना तारण म्हणून जी मालमत्ता ठेवली होती त्याची खातरजमा केली नव्हती. मालमत्तेची खातरजमा न करताही या कर्जदारांना त्यांनी लाखोंचे कर्ज दिले. काही कर्जदारांकडे थकबाकी असूनसुद्धा त्यांनी थकबाकी भरली असे दाखवून त्यांना पुन्हा कोट्यवधींचे कर्ज दिले. त्याचप्रमाणे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी स्वत:साठी बॅंकेतून कर्ज उचलले; मात्र कर्ज परत केले नाही. अशाप्रकारे धवड व त्यांच्या सहकाऱ्यांनी नियमबाह्यरीत्या कर्ज वाटप करून बॅंकेला डबघाईला आणले आणि ठेवीदारांची फसवणूक केली. 
याप्रकरणी सहकार खात्यातर्फे बॅंकेच्या व्यवहाराची तपासणी करण्यात आली. त्यात हा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी सहकार खात्याचे श्रीकांत सुपे यांच्या तक्रारीवरून 15 मे 2019 रोजी धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच धवड यांनी जामीन मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. उलट सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले. जामिनाचे सर्व मार्ग बंद झाल्याने अखेर सोमवारी धवड हे न्यायालयाला शरण आले. त्यावेळी या प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी प्रशांत माने हे दुसऱ्या प्रकरणात उच्च न्यायालयात होते. उच्च न्यायालयातील काम आटोपून माने सत्र न्यायालयात गेले त्यावेळी बराच वेळ झाला होता. त्याचप्रमाणे रिमांड पेपरदेखील तयार नव्हते. त्यामुळे न्यायाधीश सुनील पाटील यांनी धवड यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यावर तपास अधिकारी माने यांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. या अर्जावर मंगळवारी सकाळी सुनावणी होऊन न्यायालयाने धवड यांना अटक करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी न्यायालयात प्रॉडक्‍शन वारंट मिळवून अखेर मंगळवारी दुपारी धवड यांना ताब्यात घेतले आणि त्यांना अटक केली. उद्या बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करून पोलिस त्यांची कोठडी घेणार आहेत. 
धवड चौदावे आरोपी 
नवोदय बॅंक स्कॅममध्ये आतापर्यंत 13 आरोपी करण्यात आले असून अशोक धवड हे चौदावे आरोपी आहेत. यापूर्वी बॅंकेच्या संचालिका व अशोक धवड यांच्या पत्नी किरण धवड, संचालक विजय जोशी, गोविंद जोशी, मुकेश जोशी, राकेश जोशी, विकेश जोशी, प्रकाश शर्मा, सचिन मित्तल, प्रीती मित्तल, बालकिशन गांधी, लीना गांधी, हिंगल ग्रूप, झाम ग्रूप, ग्लॅटन ग्रूप, सिकटिया ग्रूप, सोमकुवर ग्रूप, देवघरे बिल्डर्स, गुळरांधे ग्रूप, पिरॅमिड ग्रूप आणि अन्य 35 ग्राहकांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com