राष्ट्रवादाचे बौद्धिक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

नागपूर - कट्टरता, धर्म किंवा असहिष्णुतेच्या माध्यमातून या राष्ट्राची व्याख्या करण्याचा प्रयत्न केल्यास देश म्हणून असलेले आपले अस्तित्वच धोक्‍यात येईल, असा इशारा देत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरून राष्ट्रवादाचे बौद्धिक घेतले.  

नागपूर - कट्टरता, धर्म किंवा असहिष्णुतेच्या माध्यमातून या राष्ट्राची व्याख्या करण्याचा प्रयत्न केल्यास देश म्हणून असलेले आपले अस्तित्वच धोक्‍यात येईल, असा इशारा देत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरून राष्ट्रवादाचे बौद्धिक घेतले.  

रा. स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सरसंघचालक मोहन भागवत या वेळी उपस्थित होते. मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर काँग्रेसने त्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यामुळे त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मात्र, राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या मुखर्जी यांनी संघाचे कौतुक किंवा टीकाटिप्पणी न करता राष्ट्रवाद आणि देशभक्ती या विषयांवर भाष्य केले. विविध मुद्द्यांवर व्यक्त होणाऱ्या हिंसक संतापामुळे सामाजिक परिस्थिती बिघडत आहे.  त्यामुळे भय आणि अविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीतून संवादाचे सर्व मार्ग अनुसरून देशाला बाहेर काढले, तरच संपूर्ण समाज लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकेल, असे ते म्हणाले. 

मुखर्जी म्हणाले, ‘‘शांतता, सौहार्द आणि जीवनाबद्दलचा आदर हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. बालकांवर व महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे देशाच्या आत्म्याला जखमा होत आहेत. फक्त अहिंसेचे व संवादाचे वातावरणच समाजाला आश्‍वस्त करू शकते.’’ वैविध्य आणि सहिष्णुतेत भारताचा आत्मा दडला असून, शांततामय सहअस्तित्व, दयाभाव आणि एकमेकांच्या मतांप्रति आदर हे आपल्या संस्कृतीचे अधिष्ठान आहे, असेही ते म्हणाले. समतोल साधण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांसोबत केवळ संवादच साधून नव्हे, तर एकमेकांसोबत समेट घडून यायला हवा. काही मतांशी आपण सहमत असू, काहींशी नाही. पण, मत व्यक्त करण्याचा अधिकार आपण नाकारू शकत नाही, असे मुखर्जी यांनी सांगितले. 

अपेक्षांचा फुगा फुटला
मुखर्जी हे रेशीमबागेत जाणार, हे निश्‍चित झाल्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी पत्र पाठवून पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर नागपुरातच भूमिका मांडेन, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, या संपूर्ण वादावर कुठलेही भाष्य त्यांनी केले नाही. त्यामुळे दोन आठवड्यांच्या उत्सुकतेचा फुगा मात्र फुटला.

सर्व समाज घटकांना एकत्र आणणे हे संघाचे उद्दीष्ट आहे. संघ ही सर्वांना जोडणारी संघटना आहे. आपण सर्व भारतीय आहोत, भारतमातेची सर्वांनीच सेवा करायला हवी.
- मोहन भागवत, सरसंघचालक

हेडगेवार यांचा गौरव
माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी आरएसएसचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मारकास भेट देत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर स्मारकामधील नोंदवहीत, ‘आरएसएसचे संस्थापक डॉ. हेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत’, असा अभिप्राय नोंदवत त्यांनी डॉ. हेडगेवार यांचा गौरव केला. 

Web Title: Former President Pranab Mukherjee Addresses Sangh Workers At Nagpur