#WorldAIDSDay : आधी करायच्या देहविक्री, आता देतात एचआयव्हीग्रस्तांना आधार 

केवल जीवनतारे 
रविवार, 1 डिसेंबर 2019

एचआयव्हीची बाधा असल्याचे लपवून त्यांना सहज व्यवसाय करता आला असता, परंतु त्यांनी एचआयव्हीचा प्रसार होऊ नये म्हणून ग्राहकांना नाकारले आणि "एचआयव्ही'रोखण्यासाठी समुपदेशनाचे काम हाती घेतले. देहविक्री करणाऱ्या पंधरावर महिला इतरांना एचआयव्हीची बाधा होऊ नये म्हणून जनजागरण करीत आहेत.

नागपूर : पोटाची भूक भागवण्यासाठी चेहऱ्याला रंग फासून त्या शरीर विकत होत्या. स्वतः यातन सहन करून दुसऱ्यांना आनंद देत होत्या. मात्र देहविक्रीतून आयुष्यात नकळत "एचआयव्ही'चे वादळ आले. जगताना मरणाच्या वेदना घेऊन जगणे त्यांच्या नशिबी आले. एचआयव्हीची बाधा झाल्याने आता जगणेच संपल्याची भावना 15 वारांगणांमध्ये निर्माण झाली होती. मात्र या महिलांना मदतीचा हात देत त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी आशेचा किरण फुलवणारी लाल रंगातील "अधिक' चिन्ह ओळख असलेली "रेडक्रॉस' संस्था पुढे आली. 

बाधितांना जगण्याचे बळ
एचआयव्हीची बाधा असल्याचे लपवून त्यांना सहज व्यवसाय करता आला असता, परंतु त्यांनी एचआयव्हीचा प्रसार होऊ नये म्हणून ग्राहकांना नाकारले आणि "एचआयव्ही'रोखण्यासाठी समुपदेशनाचे काम हाती घेतले. देहविक्री करणाऱ्या पंधरावर महिला इतरांना एचआयव्हीची बाधा होऊ नये म्हणून जनजागरण करीत आहेत. ज्या बाधित आहेत, त्यांच्यासाठी त्या आधार बनल्या. "एआरटी' औषधे मिळवून देण्यापासून तर त्या बाधितांना जगण्याचे बळ देत त्याही आयुष्यासोबत लढताहेत, खंबीरपणे जगताहेत रेडक्रॉस संस्थेच्या मदतीने. 

हेही वाचा - भयंकर बाब, ऑपरेशन थिएटरमध्ये वापरतात वापरलेले "हातमोजे'

या संस्थेने "पीअर एज्यूकेटर'पदावर त्यांना नियुक्त केले. सद्या या संस्थेने 31 पीअर एज्यूकेटरची नियुक्ती केली आहे. यातील 15 ते 18 देहविक्रय करणाऱ्या महिला असून त्यांचे आयुष्य एचआयव्हीच्या चक्रव्युहात अडकले आहे. तरीही दुसऱ्यांसाठी त्या आधार बनल्या आहेत.

इतरांना एचआयव्हीची बाधा होऊ नये, गुप्तरोगाचा संसर्ग होऊ नये, क्षयरोग होऊ नये यासाठी या वारांगणा अर्थात पीअर एज्यूकेटर रात्रीचा दिवस करतात. चुकून एचआयव्हीची बाधा झाल्यानंतर त्यांना इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून मेडिकलमध्ये ने-आण करण्यापासून तर त्यांना मदत करण्याचा माणुसकीचा धर्म या निभावतात. सोबतीला कार्यक्रम समन्वयक हेमलता लोहवे असतात. 

बदल घडवू शकतो 
वारांगनांचे आयुष्य बदलण्यासाठी तसेच त्यांना आरोग्याच्या सोयीसवलती उपलब्ध करून देण्यासाठी काम करीत असतानाच सरकारी लाभ मिळावे यासाठी या एचआयव्हीग्रस्त पीअर एज्यूकेटर म्हणून काम करीत आहेत. एक डिसेंबर एड्‌स दिनाचे निमित्त साधून यावर्षी "आपण बदल घडवू शकतो' हे घोषवाक्‍य शासनाने ठरवून दिले आहे. या घोषवाक्‍याच्या पुर्ततेसाठी या वारांगणाही पुढे सरसावल्या आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून सामान्य पीअर एज्यूकेटर काम करीत असल्याचे रेडक्रॉसच्या समन्वयक हेमलता लोहवे यांनी सांगितले. 

असे का घडले? - पोटासाठी डांबरगोळ्या विकतो हा प्राध्यापक... वाचा संघर्षगाथा

इतरांनीही घ्यावी प्रेरणा 
वारांगनांमध्ये शरीर स्वच्छता, आरोग्यासह एचआयव्हीबाबत जनजागृतीची जाणीव करून देण्यासोबतच एकमेकांच्या सहकार्यातून एचआयव्हीबाधित पीअर एज्युकेटरचा हा काफिला एकमेकांशी माणुसकीचे नाते जपत जनजागृती करण्याचे काम करतात. जे काम सामान्य करीत नाही, ते काम या एचआयव्ही बाधित वारांगणा करतात. त्यांच्या या सेवाभावाला पुरस्कार मिळत नाही. मात्र त्यांच्या या सेवेला आम्हीच सलाम करतो. 
- हेमलता लोहवे, समन्वयक, रेडक्रॉस सोसायटी, नागपूर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former prostitutes work for aids awareness