esakal | बापरे! लाखांदूर तालुक्यात पुराने केले साडेचार हजार हेक्‍टर शेतीचे नुकसान...आता शेतकऱ्यांना मिळावा मोबदला
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पुरामुळे बाधित आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तालुका कृषी विभागांतर्गत शेतीचे सर्वेक्षण व पंचनामे केले. तालुक्‍यातील ३५ गावातील एकूण चार हजार ४३९ हेक्‍टर क्षेत्र पूरबाधित होऊन विविध पिकांचे ३३ टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झाले आहे.

बापरे! लाखांदूर तालुक्यात पुराने केले साडेचार हजार हेक्‍टर शेतीचे नुकसान...आता शेतकऱ्यांना मिळावा मोबदला

sakal_logo
By
विश्‍वपाल हजारे

लाखांदूर (जि. भंडारा) : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तालुक्‍यातील वैनगंगा व चुलबंद नदीला आलेल्या पुरामुळे साडेचार हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. कृषी विभागाने प्रत्यक्ष सर्वेक्षण व पंचनाम्याच्या आधारावर तालुका कृषी विभागाने ही माहिती दिली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस वैनगंगा व चुलबंद नदीला पूर आला होता. त्यामुळे नदीकाठावरील व लगतच्या ३५ गावांतील शेतीचे नुकसान झाले होते. यात कोरडवाहू व सिंचन सुविधा असलेल्या शेतीचा समावेश आहे.

पुरामुळे बाधित आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तालुका कृषी विभागांतर्गत शेतीचे सर्वेक्षण व पंचनामे केले. त्यानुसार तालुक्‍यातील ३५ गावातील एकूण चार हजार ४३९ हेक्‍टर क्षेत्र पूरबाधित होऊन विविध पिकांचे ३३ टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा : अरे व्वा... ताडोबा, पेंच प्रकल्पाबाबत पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, वाचा सविस्तर

शेतकऱ्यांना लवकरच मदत

या नुकसानापोटी शासनाकडून कोरडवाहू शेतीला हेक्‍टरी सहा हजार ८०० आणि ओलिताच्या शेतीला हेक्‍टरी १३ हजार ५०० रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान कृषी विभागाने बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण व पंचनामे करून नुकसानग्रस्त क्षेत्र निश्‍चित केल्याने शेतकऱ्यांना लवकरच शासन मदत दिली जाईल, असे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे.

असं घडलंच कसं  : नागपूरकर दोघांना आवरला नाही गावातील नदीत पोहण्याचा मोह, आणि घडली दुर्दैवी घटना

पुरामुळे अभिलेखांसह साहित्याचे नुकसान

लाखांदूर : गेल्या महिन्यात खैरी/पट हे गाव पूर्णतः पुराच्या पाण्याखाली आले होते. पुराचे पाणी या गावातील तलाठी साजा क्रमांक 27 या कार्यालयात शिरल्याने कार्यालयातील साहित्यासह अभिलेखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

यात कार्यालयातील लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर व संगणक संच पूर्णतः बंद पडले असून जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच टेबल-खुर्च्या, कपाट यासह महत्त्वाचे अभिलेखही पूर्णतः नष्ट झाले आहे. नष्ट झालेल्या अभिलेख्यांत ऑनलाइन सातबारासाठी लागणारे मुळ रेकॉर्ड तपासणी अहवाल, सातबारा, पी. वन, पी.-३, सन १९१८ पासूनचे मूळ अभिलेख, फेरफार पंजी, वारस पंजी, तहसीलदारांचे आदेश व गाव नमुने १ ते २१ पूर्णतः नष्ट झाले आहेत. दरम्यान या तलाठी साजात खैरीपट, मांदेड, टेंभरी, डांभेविरली या गावांचा समावेश आहे.

जाणून घ्या  : असे तयार करा जैविक कीटकनाशक! शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण

यात शेतकऱ्यांच्या मुळ अभिलेखाचे नुकसान झाले आहे. येथील तलाठी श्री. जारवार यांनी सरपंच मंगला शेंडे व अन्य पदाधिकारी, गावकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून या प्रकरणाची माहिती वरिष्ठांना दिली आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)