
या सर्व घटनांची आठचण वारंवार वाळू घाटावर होतेच. साहोली घाटावर सरकारी कर्मचाऱ्यावरही हल्ले झाल्याची घटना घडल्याचेही सांगण्यात आले.
खापरखेडा,(जि. नागपूर) : कन्हान नदीतील वाळूच्या अवैध खणनातून साहोली येथील मंगेश बागडे याचा खून केल्याची घटना रविवारी सकाळी सुरादेवी मार्गावर घडली होतील. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा अटक केल्याची माहिती मिळाली आहे. वाळूच्या खणनातून मंगेशचा खून झाल्याची ही चौथी घटना आहे, हे विशेष.
मागील वर्षांपासून कन्हान नदीपात्रातील पारशिवनीच्या साहोली तर सावनेर तालुक्यातील भानेगाव घाटात रेती माफियांनी हैदोस घातला आहे. रेती घाटातून रेती चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. याकडे संबंधित प्रशासनाने कमालीचे दुर्लक्ष असल्याने त्यांना पाठबळच मिळत आहे. याशिवाय लाखोंचा महसूल बुडत आहे. वाळूच्या अवैध वाहतूक व खणनातून येथे नेहमीच भांडणे होत आहेत. या सर्व घटनांची आठचण वारंवार वाळू घाटावर होतेच. साहोली घाटावर सरकारी कर्मचाऱ्यावरही हल्ले झाल्याची घटना घडल्याचेही सांगण्यात आले.
काही वर्षांपूर्वी रेती खणना वादातून धर्मा निकोसे यांची भानेगाव येथे खून केला होता. दुसरी घटना वलनी येथे घडली होती. येथे अन्वर सिद्दिकी याचा गोळ्या घालून खून केला होता. कालांतराने पुन्हा काही दिवसानंतर सिल्लेवाडा येते वेकोलिच्या सबएरिया कार्यालयात रेती माफिया मेहताब खान याचाही खून करण्यात आला होता. याच घटनेची पुनरावृत्ती रविवारी मंगेश बागडे याच्यारूपाने झाली. वाळूच्या अवैध व्यवसायातून चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
वाळू चोरीच्या अवैध धंद्यावर अंकुश लावण्यात शासन व प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. यामागील कारणाचा तपशील घेण्याचा प्रयत्न केल्यावर यात असलेला पैसा, गावात वाढलेली बेरोजगारी व गरिबी दूर करण्यासाठी केलेले धाडस अशा काही बाबी समोर येतात. मात्र अशा अवैध धंद्यांना पाठबळ असल्याशिवाय ते शक्य नसल्याचेही समोर आले आहे. यातही कारवाई करताना सरकारी कर्मचाऱ्याचा जीव घेण्यातही मागेपुढे न पाहणारे गुंड प्रवृत्तीचे लोक सामील असल्याची चर्चाही केली जात आहे.