गावठी, देशी दारू विकताना चार महिलांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

अमरावती : गावठी व देशी दारूच्या अवैध व्यवसायात आता महिलाही अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी शहरात सात ठिकाणी केलेल्या कारवाईत चार महिलांना अटक केली. 

अमरावती : गावठी व देशी दारूच्या अवैध व्यवसायात आता महिलाही अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी शहरात सात ठिकाणी केलेल्या कारवाईत चार महिलांना अटक केली. 
महत्त्वाची बाब म्हणजे, तीन वर्षांपूर्वी शहरातील वडाळी परिसरात असलेले देशीदारूचे दुकान हटविण्यासाठी महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्यामुळे हे देशीदारूचे दुकान तर बंद झाले, परंतु गावठी दारू गाळण्याचे प्रमाण आधीपेक्षा कितीतरी पटीने वाढले आहे. त्यात परिहारपुरा परिसरातील काही घरांमध्ये चक्क महिला गावठी दारू गाळण्याच्या कामात सक्रिय असल्याची चर्चा आहे. येथून एका महिलेच्या घरामधून सात लिटर हातभट्टीची दारू फ्रेजरपुरा पोलिसांनी जप्त केली. दुसऱ्या एका महिलेच्या घरातून दहा लिटर गावठी दारू जप्त केली. त्या दोघींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे राजापेठ परिसरातील माधवनगरातसुद्धा एक महिला देशीदारूची अवैध विक्री करताना पोलिसांच्या हाती लागली. तसेच जुनीवस्ती, बडनेरा येथील पासीपुऱ्यातून एका महिलेच्या जवळून देशीदारूच्या 13 बाटल्या जप्त करण्यात आल्या. जुनीवस्ती, कालीमातानगर येथून अक्षय चव्हाण या युवकाकडून पोलिसांनी देशीदारूच्या दहा बाटल्या जप्त केल्या. भातकुलीच्या इंदिरानगर भागात नकुल दंदे या वृद्धाच्या घरातूनही देशीदारूच्या पावट्या जप्त करण्यात आल्या. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four women arrested for selling alcohol, domestic liquor