तुमसरजवळ चौदा वर्षीय मुलीला भरधाव ट्रकने चिरडले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

चौदा वर्षीय मुलीला वडिलांनी नवीन सायकल खरेदी करून दिली. शाळेत जाण्यासाठी तिला सायकलचा उपयोग होणार होता. त्यामुळे तिने सायकल शिकण्यास सुरुवात केली. तुमसर-खापावरून जाणाऱ्या गोंदिया-रामटेक मार्गावर मांगली गाव वसले आहे. याच गावातील ही चिमुकली दररोज सायकल चालविण्याचा सराव करीत होती. मुख्य मार्गाने सायकल चालवत असताना तिला एका भरधाव ट्रकने चिरडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

तुमसर (जि. भंडारा) : जवळच्या मांगली येथे भरधाव वेगातील ट्रकने चिरडल्याने सायकलस्वार विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. 1) दुपारी साडेतीनच्या सुमारास गोंदिया-रामटेक मार्गावर घडली. कीर्ती राजन पुंडे (वय 14) असे मृत मुलीचे नाव आहे.

तुमसरजवळील मांगली येथील राजन पुंडे हे वरठी येथील सनफ्लॅग स्टील कंपनीत कंत्राटी कामगार आहेत. त्यांना कीर्ती नावाची एक मुलगी आहे. ती तुमसर येथील जनता विद्यालयात आठव्या वर्गात शिकत होती. तिला शाळेत जाण्यासाठी काही दिवसांपूर्वी वडिलांनी सायकल घेऊन दिली. तेव्हापासून कीर्ती दररोज सायकल चालवण्याचा सराव करीत होती.

ट्रक बनून आला काळ

गोंदिया-रामटेक मुख्य मार्गावर मांगली गाव वसले आहे. सोमवारी (ता. 1) दुपारी कीर्ती सायकलने जवळ असलेल्या खापाकडे गेली. नंतर ती सायकल चालवीत मांगली गावाकडे जात होती. दरम्यान, रामटेकवरून गोंदियाकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने (क्र. एचआर 55/ पी 5857) तिला चिरडले. तिचा जीव घेण्यासाठी ट्रक काळ बनून आला. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.

ट्रकच्या चाकामुळे डोक्‍याचा चेंदामेंदा

तिच्या डोक्‍यावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे तिचा चेंदामेंदा झाला. या अपघातात कीर्तीचा जागीच मृत्यू झाला. तुमसर पोलिसांनी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

जाणून घ्या : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चौघांनी पाजली दारू, पुढे काय झालं वाचा...

आईवडिलांच्या स्वप्नावर विरजण

गेल्या चार वर्षांपूर्वी राजन पुंडे यांच्या मुलाचे निधन झाले. त्यामुळे त्यांनी आपल्या भावाची मुलगी कीर्तीला दत्तक घेतले होते. कीर्ती त्यांच्याकडे राहून तुमसरला शिक्षण घेत होती. वडिलांनी खरेदी करून दिलेली नवीन सायकल चालविण्याचा ती सराव करीत होती. मात्र या अपघातात तिचा जीव गेल्याने आईवडिांचे स्वप्न धूळीस मिळाले आहे. या अपघाताने गावावर शोककळा पसरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourteen-year-old girl dies after being crushed by a truck near Tumsar