
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दर महिन्यात लिपिकांकडून पगाराची देयके ऑनलाइन पाठविली जातात. ही देयके तयार करताना काही लिपिकांनी अतिरिक्त देयके तयार करून ती आपल्या खात्यात वळती केली
चंद्रपूर ः जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात धक्कादायक आर्थिक अपहार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्यांना देय नसलेली रकम लिपिकांनी स्वतःच्या खात्यात वळवत 34 लाख रुपयांचा अपहार केला. सात महिन्यांपासून सुरू असलेला हा गैरप्रकार आता उजेडात आला. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नऊ लिपिकांना निलंबित केले आहे. त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित असल्याची माहिती सीईओंनी दिली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दर महिन्यात लिपिकांकडून पगाराची देयके ऑनलाइन पाठविली जातात. ही देयके तयार करताना काही लिपिकांनी अतिरिक्त देयके तयार करून ती आपल्या खात्यात वळती केली. विसापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लिपिक नीलेश मोरे यांनी आपल्या खात्यात सहा लाखांची रक्कम वळती केली. त्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे प्राप्त झाली. त्यानुसार चौकशी करण्यात आली. त्यात मोरे यांनी अपहार केल्याचे समोर आले.
नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
त्यानंतर चंद्रपूर, माढेळी, कोठारी, राजुरा, देवाडा, कढोली, जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातूनही अशाच पद्धतीच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या. त्याअनुशंगाने वित्त विभागातील डाहुले यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी तपासणी केली असता या आठही प्राथमिक आरोग्य केंद्रात अपहार झाल्याचे समोर आले.
आठही प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिकांनी 34 लाख 41 हजार 231 रुपयांचा अपहार केला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी लिपिक गणेश धात्रक, भेंडारे, के. एस. रामटेके, ए. एस. सिद्दीकी, व्ही. पी. गेडाम, एस. बी. शिडाम, एस. एस. तेलमारे यांना निलंबित केले. आरोग्य विभागातील वरिष्ठ लिपिक कृष्णा पांडे यांनाही या प्रकरणात दोषी ठरविण्यात येऊन निलंबित करण्यात आले. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 19 लाख 97 हजारांची वसुली करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्डीले यांनी दिली.
जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली
प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी
जिल्ह्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रात अपहाराचा प्रकार समोर आल्याने विभागात खळबळ उडाली आहे. अपहाराचे प्रकार अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रांत असल्याची शंका अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आर्थिक बाबी तपासण्याची शक्यता आहे.
संपादन - अथर्व महांकाळ