दोन मुलांच्या आईने प्रियकरावर ठेवला आंधळा विश्वास... अन् झाला घात

Love affair
Love affair

अमरावती : पतीपासून विभक्त झालेल्या एका मध्यमवयीन महिलेने दुसरा जोडीदार शोधण्यासाठी शादी डॉट कॉमवर नाव नोंदविले. एका व्यक्तीसोबत तिची मैत्री झाली. मात्र, तिला ही मैत्री तब्बल 26 लाखांत पडली. मुंबईत राहणाऱ्याने तिची फसवणूक केली.

शुक्रवारी (ता. 31) त्या महिलेने गाडगेनगर ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी अजयसिंग संतोषसिंग अग्रवाल (रा. यमुनानगर, अंधेरी, मुंबई) विरुद्ध फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला. ही महिला नोकरीवर आहे. तिला लहान मुलगा व मुलगी आहे. पुढील आयुष्यासाठी तिला एक जोडीदार हवा होता. त्यासाठी तीने शादी डॉटकॉमवर नोंदणी केली. महिलेसोबत काही दिवसांत एका व्यक्तीने फोनवरुन संपर्क साधला. लग्नाची ऑफर दिली. त्यानंतर दोघांचेही बोलणे सुरू झाले. अजयसिंगने स्वत: बिल्डर असल्याचे सांगून, आईनंतर वडिलांचे कॅन्सरने निधन झाले असून मुंबईत दोन फ्लॅट आहेत, सावत्र आई आपले लग्न होऊ देत नाही, कोलकता येथे तीन कोटींचा प्रोजेक्‍ट सुरू असून, तो पूर्ण झाल्यावर अमरावती राहण्यासाठी येईल. असेही त्याने अमरावतीच्या या महिलेला सांगितले.

शादी डॉटकॉमवरील मैत्री पडली 26 लाखांत
दरम्यान, तो अमरावतीत आला. महिलेच्या मुला, मुलीसह आईलाही भेटला. त्याने कोर्ट मॅरेजचा प्रस्ताव महिलेपुढे ठेवून, पॅनकार्डसह इतरही दस्तऐवज घेतले. त्याआधारे मुंबई येथून मॅरेज सर्टिफीकेट तयार करून पाठविले.

अन्‌ सुरू झाली पैशाची डिमांड
अजयसिंगने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 15 ते 20 लाखांची गरज असल्याचे महिलेस कळविले. सुरवातीस दोन लाख, वीस लाख, एक लाख, नव्वद हजार आणि शेवटी पुन्हा दोन लाख अशी 26 लाख एवढी रक्कम त्या महिलेने अजयसिंगच्या बॅंकखात्यावर अमरावतीहून ऑनलाइन पाठविली.

ती झाली कर्जबाजारी
ज्याच्यासोबत उर्वरित आयुष्य काढण्याचे स्वप्न रंगविले. त्याला मदत करण्यासाठी या महिलेने स्वत:जवळची काही मालमत्ता विकली, कर्ज काढले. मात्र, आजपर्यंत ती मित्राला पाठविलेले कर्ज फेडत आहे.

व्हिडिओ कॉलमुळे फुटले बिंग
काही दिवसांपूर्वी अजयसिंगसोबत बोलत असताना तिला एका महिलेचा आवाज ऐकू आला. ती महिला कोण हे जाणून घेण्यासाठी तिने त्याला पुन्हा व्हिडिओ कॉल केला. महिलेबाबत विचारणा केली असता, अजयसिंगने ती मित्राची पत्नी असल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे अमरावतीच्या महिलेने मुंबईत जाऊन अजयसिंगबाबत चौकशी केली असता तो फ्रॉड असल्याचे तिच्या लक्षात आले.

त्याने दिली बदनामीची धमकी
महिलेला अजयसिंगची वास्तविकता कळल्यानंतर तिने त्याच्यापासून दूर राहण्याचे ठरविले. उधार पैसे परत मागितले, त्याने पोलिसात तक्रार केल्यास व्हीडीओ आणि फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी त्या महिलेला दिली.

प्रकरण फसवणूकीशी संबंधित आहे. गुन्हा दाखल झाल्याने बारकाईने चौकशी केल्या जाईल. शक्‍य तेव्हा अजयसिंगच्या अटकेसाठी प्रयत्न केल्या जातील.
- मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com