अमरावती जिल्ह्यात बोगस पॅथॉलॉजी लॅबची दुकानदारी; नागरिक अधिकृत लॅब ओळखणार कशी? 

राज इंगळे 
Sunday, 22 November 2020

अशा लॅबवर अंकुश लावण्यासाठी लॅबचे सर्वेक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून जिल्ह्यात किती व कोणकोणत्या लॅब अधिकृत आहेत याची माहिती मिळेल आणि नागरिकांना बोगस लॅबपासून सावध राहता येईल

अचलपूर (जि. अमरावती) : दान करून योग्य उपचार व्हावा याकरिता डॉक्‍टर विविध प्रकारच्या चाचण्या करण्याकरिता सांगतात. मात्र याचाच फायदा पॅथॉलॉजी लॅबधारक उठवीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्या शुल्कावर कोणत्याही प्रकारचे शासनाने निर्बंध नसल्याने जिल्ह्यात बोगस पॅथॉलॉजी लॅबची दुकानदारी सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे.

अशा लॅबवर अंकुश लावण्यासाठी लॅबचे सर्वेक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून जिल्ह्यात किती व कोणकोणत्या लॅब अधिकृत आहेत याची माहिती मिळेल आणि नागरिकांना बोगस लॅबपासून सावध राहता येईल. चाचण्या करतात ती लॅब खरोखरच अधिकृत आहे का याची अनेकदा रुग्णांना माहितीच नसते. त्यामुळे त्यांची फसगत होते. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या पॅथॉलॉजी लॅब अधिकृत आहे की नाही, याची माहिती संबंधित विभागाने तालुकानिहाय जाहीर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्‍टिसिंग पॅथॉलॉजिस्ट ऍण्ड मायक्रोबायोलॉजिष्ट या संघटनेने राज्यातील सर्व पॅथॉलॉजी लॅबचे सर्वेक्षण करावे अशी मागणी केली आहे. मात्र अद्यापही सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे अधिकृत पॅथॉलॉजी लॅब नेमक्‍या कोणत्या हेच कळायला मार्ग नाही.

जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पॅथॉलॉजी लॅब बोगस पद्धतीने चालविल्या जात आहेत. याचा अनेकदा प्रत्यय आला आहे. मात्र असे असतानाही शासन दखल का घेत नाही हे कळायला मार्ग नाही. शासनाने लवकरात लवकर पॅथॉलॉजी लॅबचे सर्वेक्षण करावे जेणेकरून अधिकृत लॅब किती आहेत व कोणत्या आहेत याची माहिती रुग्णांना मिळेल.
- डॉ. ओमप्रकाश बोहरा, 
परतवाडा.

 

जिल्ह्यात जर बोगस पॅथॉलॉजी लॅब सुरू असल्याची शंका कुणाला असेल तर त्यांनी जिल्हा तथा तालुका स्तरावर बोगस डॉक्‍टरांच्या बाबतीत कार्यवाही करणाऱ्या समितीकडे तक्रार करावी. जेणेकरून बोगस लॅबवर कारवाई करता येईल.
- डॉ. श्‍यामसुंदर निकम, 
जिल्हा शल्यचिकिसक, अमरावती.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud pathology labs in Achalpur Amravati district