सांगू कुणाला? "क्‍यूआर कोड'मधून "ई-कन्टेन्ट' मिळेना

मंगेश गोमासे 
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

  • मराठी वगळता इतर भाषांचे कन्टेंटच नाही 
  • शिक्षक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक 
  • 13 हजारांपेक्षा अधिक व्हिडिओ तयार 
  • 95 टक्के कन्टेन्ट अपलोड 

नागपूर : सहावी ते बारावीच्या मुलांसाठी अत्याधुनिक शिक्षणपद्धती लागू करीत त्यांना ई-कन्टेन्ट देण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने बालभारतीच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकांवर "क्‍यूआर कोड' छापले. मात्र, चार वर्षांपासून "क्‍यूआर कोड'मधून "ई-कन्टेन्ट' शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचे चित्र आहे. 

बालभारतीद्वारे माध्यमातून 2015 सालापासून सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांवर आधारित व्हिडिओ, तज्ज्ञांची व्याख्याने, विज्ञानाचे प्रयोग, गणित विषयातील पद्धती हे "क्‍यूआर कोड'मधून लिंकच्या आधारे अभ्यासासाठी देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. या लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील धडा पीडीएफ स्वरूपात किंवा संबंधित धडा, कविता, गणित, विज्ञानाचे प्रयोग शिकता आले असते. 

साधारणत: नव्या पुस्तकांमध्ये "क्‍यूआर कोड' उपलब्ध करून देण्यात येणार होता. त्यासाठी जवळपास 13 हजारांपेक्षा अधिक व्हिडिओ तयार करण्यात आले. हे शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी विविध संस्थांची मदत घेण्यात आली. त्यात विद्या प्राधिकारणी आणि पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचा प्रामुख्याने समावेश होता. त्यानुसार काही प्रमाणात"ई-कन्टेन्ट' अपलोड करण्याचे काम करण्यात आले. 

विभागाकडे केवळ मराठीसाठीच अद्याप "कन्टेन्ट' थोड्याफार प्रमाणात तयार असून उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये "ई-कन्टेन्ट' अद्यापही तयार नाही. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी "क्‍यूआर कोड' स्कॅन करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना कुठलेच कन्टेन्ट बघायला मिळत नाही.

दुसरीकडे यासाठी विद्या प्राधिकरणाकडून तज्ज्ञ शिक्षकांचे प्रशिक्षणही राबविण्यात आलेत. मात्र, त्या प्रशिक्षणाचाही फायदा मिळाला नाही. याप्रकाराने सरकारचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचे चित्र आहे. यासंदर्भात बालभारतीच्या संचालिका शकुंतला काळे यांना संपर्क केला असता, त्या उपलब्ध होऊ शकला नाहीत. 

उर्वरित कन्टेन्ट लवकरच अपलोड करण्यात येईल 
"क्‍यूआर कोड'वर जवळपास 95 टक्के कन्टेन्ट अपलोड करण्यात आलेला आहे. जवळपास 13 हजारांपैकी बरेचसे शैक्षणिक साहित्याचा त्यात समावेश आहे. उर्वरित कन्टेन्ट लवकरच अपलोड करण्यात येईल. कुठे तांत्रिक बाबीमुळे ते दिसत नसल्यास संबंधितांना तक्रार करता येईल. 
- विलास गरडे, 
उपसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud from "QR Code"