संगीत कलाकार दारोदार भटकत विकतोय प्लास्टिकच्या वस्तू, पण त्यातूनही भागत नाही पोटाची भूख

सायराबानो अहमद
Thursday, 29 October 2020

धामणगाव तालुक्‍यातील शेकडो कलाकारांना कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम नसून त्यांच्या कमाईचे संपूर्ण साधन बंद आहेत. त्यामुळे आज कलाकार वेगवेगळ्या माध्यमातून उत्पन्नासाठी दारोदार भटकत आहेत.

धामणगावरेल्वे ( जि. अमरावती ) : राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर नावलौकीक असणारे अनेक संगीत कलाकार शहरात आहेत. कोरोनाने संकटाने मात्र या कलाकारांना रस्त्यावर आणले आहे. उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शहरातील प्रख्यात ऑर्गन वादक प्रमोद भेंडे यांच्यावर प्लास्टिकच्या वस्तू विकण्याची वेळ आली आहे.

धामणगाव तालुक्‍यातील शेकडो कलाकारांना कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम नसून त्यांच्या कमाईचे संपूर्ण साधन बंद आहेत. त्यामुळे आज कलाकार वेगवेगळ्या माध्यमातून उत्पन्नासाठी दारोदार भटकत आहेत. संगीत कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील प्रख्यात ऑर्गन वादक प्रमोद भेंडे हे प्लॅस्टिकच्या वस्तू विकण्यासाठी प्रत्येकाच्या दारोदारी भटकत आहेत. मात्र, त्यातूनही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे भेंडे सांगतात. भेंडे यांच्याप्रमाणेच शरद पोटफोडे, अमोल खडसे, अमोल काळबांडे, संदीप काळबांडे, सप्ताह इंगोले, सुनील वानखेडे, पद्माकर गावंडे, बंडू जुनघरे, स्नेहल जुनघरे, पप्पू यादव अशा अनेक कलाकारांसमोर उदरनिर्वाहचा प्रश्‍न आ वासून उभा आहे. 

हेही वाचा - दिवसा वनभ्रमंती, रात्रीला मचाणावर जागरण; तेव्हा कुठं पिंजऱ्यात अडकला वाघोबा

संघटनांच्या माध्यमातून या कलाकारांनी सरकारला तहसीलदार, आमदार, खासदार, पालकमंत्री आदींच्या माध्यमातून अनेक निवेदने दिली. परंतु, अजूनही कलाकारांना साधे आश्‍वासनही मिळाले नाही. त्यामुळे कलाकार अस्वस्थ झाले आहेत.

हेही वाचा - शेपूट नसलेला श्वान बघितला ना? कधी प्रश्न पडला, का...

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने सर्वांच्या हितासाठी संचारबंदी लागू केली. मात्र यामध्ये सर्वसामान्यांचे नुकसान तर झालेच. पण माझ्या कलाकार बांधवांना या संचारबंदीचा फार मोठा त्रास सोसावा लागत आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे संगीत कार्यक्रम नसल्याने कलाकार मात्र अस्वस्थ झाला आहे. सरकारने संगीत कलाकारांना आर्थिक मदत करणे योग्य ठरणार आहे.
-डॉ. भोजराज चौधरी, जिल्हाध्यक्ष, स्व. केशवराव भोसले प्रतिष्ठान अमरावती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: organ player selling plastic things due to corona in dhamangaon railway of amravati