ज्येष्ठांचे लसीकरण मोफत व्हावे 

केवल जीवनतारे
शनिवार, 12 मे 2018

नागपूर - छोट्या मुलांप्रमाणे ज्येष्ठांनाही अतिदक्षतेची गरज आहे. "ज्येष्ठ झाले म्हणजे त्यांना सोडून द्या', हीच भावना समाजात वाढत आहे. मात्र, बोबडे बोल, बडबडगीते गात आपलाही त्याच दिशेने प्रवास सुरू असतो, हे आपण विसरतो. यामुळे बोट धरून चालायला शिकवणाऱ्यांचा कणा वाकू नये, ही भावना प्रत्येकाने जोपासावी. साठी ओलांडल्यानंतर "एक पोळी आणि दहा गोळी', ही म्हण लक्षात ठेवत घरातील ज्येष्ठांसाठी प्रतिबंधात्मक औषधशास्त्रानुसार लसीकरण, हा सर्वोत्तम उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ज्येष्ठांच्या आरोग्यदायी जीवनासाठी सरकारकडून मोफत लसीकरण व्हावे, अशी शिफारस ते करतात. 

राज्यात एक कोटी 50 लाख ज्येष्ठ आहेत. यात 70 लाख पुरुष, 80 लाख महिला आहेत. त्यांच्यासाठी औषधोपचारासह लसीकरण तुमच्या दारी योजना राबवावी, असे वृद्धत्वरोगशास्त्र तज्ज्ञ डॉ. संजय बजाज म्हणाले. सध्या काळ बदलत आहे. घरोघरी औषधोपचाराची पद्धत रूढ होत आहे. यासाठी खास क्‍लिनिक आहेत. डॉक्‍टर, नर्सेसची सोय आहे. मुंबईत बऱ्याचशा संस्था सेवा देताहेत. ज्येष्ठ रुग्णांना किफायतशीर दरामध्ये घरी नर्सिंग सेवा 24 तास उपलब्ध आहे. ज्येष्ठ स्वतःच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक हालचालींकडे लक्ष देऊ शकत नाहीत, भावी पिढी तंत्रज्ञानावर स्वार आहे. त्यामुळे घरीच आरोग्य सेवा देणारे क्‍लिनिक फायदेशीर ठरते. ठरलेल्या तारखांप्रमाणे नियमितपणे डॉक्‍टर, परिचारिका घरी येऊन सेवा देतात, हा पर्याय ज्येष्ठांसाठी वरदायी आहे. 

वैद्यकीय संशोधनानुसार, ज्येष्ठांच्या आरोग्यदायी जगण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरते. यामुळे सरकारकडून मोफत लसीकरण व्हावे. त्यामुळे उतारवयातील रोगांना रोखता येईल. स्वाइन फ्लू, टायफॉइड, मेंदूज्वर, न्यूमोनिया, पाण्यातून होणारी कावीळ, दमा, न्यूमोकोकल या ज्येष्ठांच्या आजारासाठी लसी दिल्या जातात. ज्येष्ठांनी डॉक्‍टरांकडून लस घेऊन आयुष्यभर निरोगी राहावे, असेही ते म्हणाले. 

वृद्ध व्याधी चिकित्सा केंद्राची गरज 
ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आयुष्य सन्मानाने जगता यावे, यासाठी ज्येष्ठ नागरिक पालनपोषण, वैद्यकीय सेवा आणि कल्याणकारी कायदा आहे. मात्र, त्याचा ज्येष्ठांना म्हणावा असा उपयोग होत नाही. त्यांच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेत सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात ज्येष्ठ व्याधी चिकित्सा केंद्र स्थापावे. बालरोगशास्त्रात गरजेप्रमाणे वाढ झाली, बालकांच्या आरोग्यांची सर्वच निगा राखतात. त्या तुलनेत बालरोगतज्ज्ञांची संख्या मोठी आहे. मात्र, ज्येष्ठांच्या डॉक्‍टरांना "जेरियाट्रिशियन' अर्थात वृद्धत्वरोगशास्त्र विकसित होण्याची गरज आहे. देशात चेन्नईत वृद्धत्वरोगशास्त्र हा अभ्यासक्रम आहे, असे त्यांनी सांगितले. 

लहान मुलांपेक्षा ज्येष्ठांना लसीकरणाची जास्त गरज आहे. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रोगांसाठीच्या प्रतिबंधात्मक लस आहेत. पुन्हा पुन्हा जमिनीवर पडणे, उच्च रक्तदाब, मधुमेह, डिमेन्शिया, वात, पारकीन सोनिझम, किडनीच्या आजारावर लस उपलब्ध नसली तरी, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय आहेत. विशेष असे की, दमा, न्यूमोकोकल, न्यूमोनियासह अनेक आजारांवर लसीकरण ज्येष्ठांसाठी प्रभावी आहे. 
- डॉ. संजय बजाज, वृद्धत्वरोगशास्त्र तज्ज्ञ, नागपूर. 

Web Title: Free of vaccination of the senior citizens