क्षुल्लक कारणातून मित्राने केला खून 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

नवजीवन कॉलनीतील सिद्धिविनायक मंदिरासमोरील झाडाच्या ओट्यावर बसून मृत तुषार व त्याचा अल्पवयीन मित्र (वय 16) हे दोघेही गप्पा मारत होते. गप्पांचे पर्यवसान भांडणात होऊन अल्पवयीन आरोपीने रागाच्या भरात तुषारच्या पोटावर चाकूने सपासप वार केले.

कळमेश्वर - गप्पा मारताना दोन मित्रांत झालेला वाद विकोपाला पोहचल्याने एकाने दुसऱ्याचा खून केल्याची घटना शनिवारी दुपारी कळमेश्‍वर येथील नवजीवन कॉलनीत घडली. तुषार विजय झोडे (वय 19, रा. पठाण ले-आउट, ब्राह्मणी) असे मृताचे नाव आहे. 

नवजीवन कॉलनीतील सिद्धिविनायक मंदिरासमोरील झाडाच्या ओट्यावर बसून मृत तुषार व त्याचा अल्पवयीन मित्र (वय 16) हे दोघेही गप्पा मारत होते. गप्पांचे पर्यवसान भांडणात होऊन अल्पवयीन आरोपीने रागाच्या भरात तुषारच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. यानंतर अल्पवयीन आरोपी घटनास्थळवरून पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तुषारला परिसरातील नागरिकांनी नागपूरला उपचारासाठी पाठविले. मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालविली. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. यातील अल्पवयीन आरोपीला खापरखेडा येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. तुषारचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा नागरिकांत आहे. 

Web Title: friend murdered due to trivial reasons in nagpur

टॅग्स