१७ दिवसांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता आरोपी; कर्नाटकातील बेळगावमधून आली ‘गुड न्यूज’

अरविंद ओझलवार
Wednesday, 10 February 2021

अटक करण्यासाठी पोलिसांनी राज्यभर पथके पाठविली होती. अखेर काल रात्री त्याला कर्नाटकातील बेळगाव येथून अटक करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर आरोपी पोलिसांना हुलकावणी देत होता.

उमरखेड (जि. यवतमाळ) : अवैध वाळूचा ट्रक पकडण्यास गेलेले नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा व फरार असलेला मुख्य संशयित आरोपी वाळूमाफिया अविनाश चव्हाण यास उमरखेड पोलिसांनी कर्नाटकातील बेळगाव येथे सोमवारी रात्री दीडच्या सुमारास जेरबंद केले.

संशयित आरोपी अविनाश चव्हाण हा मागील १७ दिवसांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता. त्याला अटक करण्यासाठी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्यभर कामबंद आंदोलन केले होते. याबाबत मंगळवारी (ता. ९) उमरखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

अधिक वाचा - टिनाच्या शेडात पाच मुली, माय आणि आजी, चार महिन्यांपासून नाही अंघोळ

२३ जानेवारीच्या रात्री दहा वाजता अवैध वाळूचा ट्रक पकडण्यासाठी गेलेले उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर वाळूमाफिया अविनाश चव्हाण व साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेत नायब तहसीलदार गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते.

पोलिसांनी या घटनेतील सात संशयित आरोपींना अटक केली होती. परंतु, मुख्य संशयित आरोपी अविनाश चव्हाण घटनेच्या दिवसापासून फरार होता. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी राज्यभर पथके पाठविली होती. अखेर काल रात्री त्याला कर्नाटकातील बेळगाव येथून अटक करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर आरोपी पोलिसांना हुलकावणी देत होता.

त्याने दिग्रस, कारंजा, वाशिम, नारायणगाव, पुणे, पणजी (गोवा) असा प्रवास करून कर्नाटकातील बेळगाव येथे थांबला. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बेळगाव येथे धडक देत त्याच्या नातेवाइकांच्या घरून त्याला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ संशयित आरोपींना अटक केली आहे.

जाणून घ्या - मामा-भाचाच्या वयात फक्त चार वर्षांचा फरक; मित्रांसारखे राहत असताना विसरले नात्याचा इतिहास आणि घडली अनुचित घटना

‘मोक्का’अंतर्गत कारवाई तीन-चार दिवसांत होणार

आरोपींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई तीन-चार दिवसांत होणार असल्याची माहितीही उपविभागीय पोलिस अधिकारी वालचंद मुंडे व ठाणेदार संजय चोबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात आरोपीला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, त्यांचीदेखील माहिती काढून त्यांच्यावरसुद्धा कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणातील अनेक आरोपींवर पोलिसांत विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदर मुख्य संशयित आरोपी अविनाश चव्हाण यास वाळूव्यवसायात मदत करणारे कोणकोण होते, याबाबत पोलिस तपास लावणार असल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fugitive main suspect caught by Yavatmal police