मुख्यमंत्र्यांच्या योजनेचा निधी, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात पळविला!

मनोज भिवगडे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

'मागेल त्याला शेततळे' या योजनेसाठी अकोला जिल्ह्यातून 79 लाखांच्या अनुदानाची मागणी शासनाकडे नोंदविली होती. कृषी आयुक्तालय पुणे यांच्या 7 ऑगस्ट 2019 च्या पत्रानुसार अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यासाठी 31.50 लाख रुपये अनुदान वितरीत केले होते.

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'मागेल त्याला शेततळे' या योजनेत अकोला जिल्ह्याकरिता मंजूर 31.50 लाखांचा निधी कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या अमरावती जिल्ह्यात पळविण्यात आला. विभागीय कृषी सहसंचालकांच्या आदेशाने 15 लाखांची निधी परस्पर अमरावती जिल्ह्यासाठी वळती करून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले. पूर्वी पश्चिम महाराष्ट्र-विदर्भ-मराठवाडा असा प्रांतिक वाद राजकीय व्यासपीठावर असायचा. आता मात्र जिल्ह्या-जिल्ह्यात वाद घडवून आणण्याचा प्रयत्न शासकीय अधिकारी करीत असल्याचा आरोप आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे. 

'मागेल त्याला शेततळे' या योजनेसाठी अकोला जिल्ह्यातून 79 लाखांच्या अनुदानाची मागणी शासनाकडे नोंदविली होती. कृषी आयुक्तालय पुणे यांच्या 7 ऑगस्ट 2019 च्या पत्रानुसार अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यासाठी 31.50 लाख रुपये अनुदान वितरीत केले होते. अकोला जिल्ह्यासाठी मंजूर अनुदानातील 15 लाख रुपये कोणताही अधिकार नसताना विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग यांनी अमरावती जिल्ह्यासाठी वळती करण्याचा आदेश 9 ऑगस्ट रोजी काढला. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आमदार सावरकर यांनी अमरावती विभागीय कृषी सहसंचालक नागरे यांना जाब विचारला असता शासकीय नियमांचे पालन होईल, असे कोणतेही उत्तर त्यांनी दिले नसल्याचा आरोपही आमदारांनी केला आहे. 

कृषी आयुक्तांचा आदेश काय म्हणतो?
कृषी आयुक्तालय पुणे कार्यालयाकडून 7 ऑगस्ट रोजी काण्यात आलेल्या आदेशनुसार मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनांंतर्गत अकोला जिल्ह्यासाठी मागेल त्याला शेततळे या योजनेतून 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता 38.88 कोटी 38.26 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. आजमितीस अर्थसंकल्प शाखेकडे शिल्लक रक्कम 31.50 लाख निधी पैकी 31.50 लाख निधी अकोला जिल्ह्यास पूर्ण झालेल्या शेततळ्यांपैकी अनुदान प्रलंबित शेततळ्यांचे अनुदान अदायगीसाठी रक्कम विचारात घेवून विभागीय कृषी सहसंचालक यांना बी.डी.एस. प्रणालीद्वारे वितरित करण्यात यावे. या पत्रानुसार कृषी सहसंचालकांना प्राप्त निधी हा अकोला जिल्ह्यासाठीच देण्यात आला असल्याचे स्पष्ट होते. 

कृषी सहसंचालकांनी काढलेल्या आदेशनुसार!
अमरावती विभागीय कृषी सहसंचालकांकडे प्राप्त झालेल्या अनुदानानुसार 9 ऑगस्टलाच त्यांनी पुणे येथे कृषी संचालकांसोबत चर्चा केल्याचे दर्शवून त्याच दिवशी निधी वळता करण्याचा आदेश काढला. मृत संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागाचे विभागीय तंत्र अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह काढलेल्या आदेशनुसार 31.50 लाख रुपयांच्या निधीपैकी 16.50 लाख रुपये अकोला व 15 लाख रुपये अमरावती जिल्ह्यासाठी वितरित करण्यात आला. त्यामुळे अकोला जिल्ह्याच्या नावाने कृषी आयुक्तालयाकडून वितरित करण्यात आलेला निधी पळविण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे.  

कृषिमंत्री म्हणतात, माहिती नाही!
कृषी सहसंचालकांनी काढलेला आदेशानुसार अकोला जिल्ह्याचा निधी पळविण्याचा प्रयत्न झाला. याबाबत राज्याचे कृषी मंत्री अनिल बोंडे जे स्वतः अमरावती जिल्ह्यातील आहे, त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. याबाबत मंगळवारी मंत्रालयात गेल्यानंतर माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी सांगितले. त्यांच्याच विभागाचा निधी त्यांच्याच जिल्ह्यात वळती होत असताना त्यांना अधिकाऱ्यांनी साधी माहिती देऊ नये, एवढे धाडस अधिकारी करू लागल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The funds of the CMs scheme have been diverted to the District of Agriculture Minister