गडचिरोली: पुरात वाहून गेलेले 12 जण सुखरूप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

गडचिरोली- दुथडी भरून वाहत असलेल्या नदीतून नावेद्वारे नदीच्या दुसऱ्या टोकावर जात असताना पाण्याच्या प्रवाहात नाव उलटून 12 जण बुडाले होते. यातील सर्वांना तीन तासानंतर वाचविण्यात शोध पथकाला यश आले. देसाईगंज तालुक्‍यातील सावंगीजवळील वैनगंगा नदीच्या पात्रात आज (मंगळवार) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

देसाईगंज येथून जवळ असलेल्या ब्रह्मपुरी तालुक्‍यातील लाडज हे दीड हजार लोकसंख्येचे गाव वैनगंगा नदीच्या मध्यभागी आहे. मात्र पूल नसल्याने येथील नागरिक, विद्यार्थी नावेनीच ये-जा करीत असतात. प्रशासनाने या गावाचे पुनर्वसन केले. घरेही बांधून दिली; मात्र बहुतांश नागरिक लाडज येथेच राहतात. आज सकाळी दोन विद्यार्थ्यांसह बारा जण नावेद्वारे सावंगी येथे निघाले असता पाण्याच्या प्रवाहाने नाव नदीच्या मध्यभागी उलटली. ही बाब नदी किनारी असलेल्या नावाड्यांना कळताच त्यांनी नावेद्वारे शोधकार्य सुरू केले. नयन सिंगनाथ बनकर, जुनेद सिंगनाथ बनकर हे दोन भाऊ एक किमी अंतर पोहत नदी पार करीत असताना त्यांना नावाड्यांनी बाहेर काढले. त्यांची आई सूर्यकांता हिलाही वाचविण्यात यश आले. सकाळी नऊपासून ब्रह्मपुरी तसेच देसाईगंज येथील बचाव पथक व नावाड्याकडून अन्य नऊ बेपत्ता लोकांचा शोध सुरू होता. दरम्यान दुपारी बाराच्या सुमारास सोनेगाव लगतच्या नदीच्या पात्रातून सर्वांना वाचविण्यात यश आले.

चार दिवसांपासून संततधार
गडचिरोली जिल्ह्यात मागील चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. अनेक मार्ग आजही बंद आहेत. जवळपास दोनशे गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे.

Web Title: Gadchiroli: 12 people were safely carry flood