Abhijit Pakhare : गडचिरोलीत स्वत:हून ‘पोस्टिंग’ घेणारे बीडीओ ‘युपीएससीत’ही चमकले

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून स्वतःहून गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात सेवेची संधी मागितल्याने गटविकास अधिकारी अभिजित पाखरे सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय झाले होते.
Abhijit Pakhare
Abhijit Pakharesakal

गडचिरोली - एरवी नक्षलग्रस्त, अतिमागास गडचिरोली जिल्ह्यात नोकरी करणे म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा भोगणे, असाच गैरसमज अधिकारी वर्गात असताना या गैरसमजाला फाट्यावर मारत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वतःहून गडचिरोली जिल्ह्यात पोस्टिंग घेणारे गटविकास अधिकारी अभिजित पाखरे यांनी यूपीएससीतही यशाचे शिखर गाठले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून स्वतःहून गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात सेवेची संधी मागितल्याने गटविकास अधिकारी अभिजित पाखरे सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय झाले होते. आता त्यांनी यूपीएससीतही यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे, पाखरे यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात प्राप्त केले. मात्र हे माहिती त्यांना मिळाली तेव्हा ते अहेरीत निवडणूक प्रक्रियेत कर्तव्य बजावत होते.

अभिजित गहिनीनाथ पाखरे हे मूळचे बिड जिल्ह्यातील पाडळी तालुक्यातील शिरूर कासार गावाचे रहिवासी आहेत. त्यांचे आई- वडील शिक्षक आहेत. त्यामुळे घरात शिक्षणाचे वातावरण होते. खासगी शाळेत शिक्षक असलेले वडील ग्रामपंचायतीचे सरपंचही आहेत. २०१९ मध्ये त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी या पदासाठी त्यांची निवड झाली.

प्रशिक्षण पूर्ण केल्यावर नाशिकच्या येवला येथे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी म्हणून काम केल्यावर त्यांची पहिली नियमित नियुक्ती होणार होती. आदिवासीबहुल, मागास व अतिदुर्गम भागातून प्रशासकीय सेवेची सुरवात करण्याच्या हेतूने त्यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहून गडचिरोली जिल्ह्यातच पोस्टिंग देण्याची विनंती केली होती.

त्यानुसार त्यांना गडचिरोलीच्या अहेरी या अत्यंत संवेदनशील ठिकाणी गटविकास अधिकारी म्हणून नेमण्यात आले. १३ मार्च २०२४ पासून ते अहेरीत कर्तव्य बजावत होते. दरम्यान, त्यांनी २०२३ मध्ये यूपीएससी २०२३ ची नागरी सेवा परीक्षाही दिली होती. यात ७२० व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.अभिजित पाखरे यांनी गावातील जिल्हा परीषद शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतले.

पुढचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण बीडच्या चंपावती विद्यालयात घेतले. त्यानंतर त्यांनी पदवी संपादन केल्यावर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. आधी एमपीएससी व नंतर यूपीएससीत बाजी मारत त्यांनी यशाला गवसणी घातली आहे. असा अभ्यासू, तडफदार आणि कर्तव्यतत्पर अधिकारी मिळाल्याबद्दल गडचिरोली जिल्हावासींनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com