

Gadchiroli Collector
esakal
गडचिरोली : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंगळवारी (ता. २२) भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावांचा दौरा केला. यातील काही गावांत जायला नीट रस्ताच नसल्याने त्यांनी दुचाकीवर मागे बसून या गावांना भेटी दिल्या. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर, गोपनार, मुरडपार, हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत जास्त पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवावा.
रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षण, घरकुल व अन्य मूलभूत सुविधांमधील कमतरता निश्चित करून संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही तत्काळ सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पंडा यांनी भामरागड तालुक्याचा विस्तृत दौरा केला.
या दौऱ्यात त्यांनी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांसह पायाभूत विकासकामे आणि नागरिकांना उपलब्ध शासकीय सेवांचा आढावा घेतला. यावेळी पोलिस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह विविध विभागांचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे जिल्हाधिकारी पंडा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी होडरी येथून लष्कर आणि गोपनार या अतिदुर्गम गावांपर्यंत दुचाकी वाहनांनी पोहोचले. या प्रत्यक्ष क्षेत्रभेटीत त्यांनी मार्गावरील दळणवळणाची स्थिती तसेच दुर्गम गावांमधील पायाभूत सुविधांची पाहणी केली.
वनहक्क पट्ट्यांचे वाटप या भेटीदरम्यान वनहक्क प्राप्त नागरिकांच्या महसूली अभिलेखांबाबतही कार्यवाही करण्यात आली. लष्कर येथील ५ आणि गोपनार येथील ११ अशा एकूण १६ वनहक्क पट्टेधारकांना सात-बारा उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. वनहक्कधारकांना त्यांच्या पात्रतेनुसार विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.