Gadchiroli News : काँग्रेसचे डॉ. कोडवते दाम्पत्याचा भाजप प्रवेश

प्रदेश काँग्रेसचे चिटणीस डॉ. नितीन कोडवते व त्यांच्या पत्नी महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Dr. nitin Kodwate and Dr. Chanda Kodwate
Dr. nitin Kodwate and Dr. Chanda Kodwatesakal

गडचिरोली - प्रदेश काँग्रेसचे चिटणीस डॉ. नितीन कोडवते व त्यांच्या पत्नी महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते यांनी शुक्रवार (ता. २२) मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डॉ. कोडवते दांपत्य हे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

गडचिरोली -चिमूर या लोकसभा क्षेत्रासाठी डॉ. नितीन कोडवते पूर्वीपासूनच इच्छुक होते. यापूर्वी त्यांच्या पत्नी डॉ. चंदा कोडवते यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राची निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला होता. तसेच महाविकास आघाडीत गडचिरोली- चिमूर हे लोकसभा क्षेत्र काँग्रेसच्या वाट्याला आले आहे.

दोन दिवसापूर्वी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये गडचिरोली-चिमूर या लोकसभा क्षेत्रातून डॉ. नामदेव किरसान यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. या लोकसभा क्षेत्रातून दुसरे दावेदार म्हणून डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नावावरदेखील चर्चा झाली होती. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी डॉ. उसेंडी यांना लोकसभेएवजी विधानसभा निवडणूक लढविण्याचे निर्देश दिल्याचे कळते.

दरम्यान काँग्रेसकडून आपल्याला लोकसभा व पुढील विधानसभेची देखील उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात येताच डॉ. कोडवते दाम्पत्याने भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाचा प्रभाव आपल्यावर पडला असल्याने आपण भाजपत प्रवेश करत असल्याचे डॉ. कोडवते यांनी प्रवेश घेताना सांगितले.

होईल का मनोरथ पूर्ण?

काँग्रेसमध्ये लोकसभेचे तिकिट मिळणार नाही आणि पुढील विधानसभेतही तिकीट मिळण्याची शक्यता धुसर असल्याने डॉ. कोडवते दाम्पत्याने काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ धरले. पण भाजपमध्येही यावेळेस लोकसभा तिकिटासाठी प्रचंड स्पर्धा आहे. विद्यमान खासदार अशोक नेते, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम आणि संघाकडून संधान साधत असलेले युवा नेते डॉ. मिलिंद नरोटे यांच्यात अटीतटीची स्पर्धा सुरू आहे.

त्यामुळे येथेही डॉ. कोडवतेंना लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता नाही. आगामी विधानसभेत विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी पहिली पसंती असतीलच, शिवाय लोकसभेत उमेदवारी मिळाली नाही, तर डॉ. मिलिंद नरोटे विधानसभेसाठी नव्या दमाने प्रयत्न करतील अशा स्थितीत डॉ. कोडवतेंचा विचार भाजप पक्षश्रेष्ठी करतील, अशी चिन्हे सध्यातरी नाहीत. त्यामुळे भाजप प्रवेशाने त्यांचे मनोरथ पूर्ण होतील काय, असा प्रश्नही विचारला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com