गडचिरोली जिल्ह्याला पुराने वेढले; तब्बल १२ मार्ग झाले बंद 

Gadchiroli flood
Gadchiroli flood

गडचिरोली : मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विक्रमी विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला असून अनेक वर्षांनंतर गडचिरोली जिल्ह्यात पुराचे संकट अधिकच तीव्र झाले आहे. पुरामुळे जिल्ह्यातील तब्बल १२ मार्ग बंद असून अनेक ठिकाणी पुरात अडकलेल्या नागरिकांना प्रशासनाच्या बचाव पथकाने सुरक्षित स्थळी हलविले आहे. 

सोमवारी (ता. ३१) दुपारी दोन वाजता प्राप्त माहितीनुसार गोसेखुर्द धरणाचे १३ दरवाजे ५ मीटरने, तर २० दरवाजे साडेचार मीटरने उघडण्यात आले. विशेष म्हणजे या दरवाज्यांतून तब्बल ३० हजार २३७ क्‍यूमेक्‍स पाण्याचा विक्रमी विसर्ग सुरू होता. त्यानंतर रात्री पावणेआठ वाजता प्राप्त माहितीनुसार गोसेखुर्द धरणातून २३ हजार ४५५ क्‍यूमेक्‍स पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे वैनगंगा, कठाणी, पाल, खोब्रागडी, गाढवी अशा अनेक नद्या फुगल्या आहेत. गडचिरोली-आरमोरी, आरमोरी-ब्रह्मपुरी, देसाईगंज-ब्रह्मपुरी, गडचिरोली-चामोर्शी, असे अनेक मार्ग बंद आहेत. 

गोसेखुर्द धरणातील विसर्गामुळे आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी या तीन तालुक्‍यांना बसला आहे. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. पुराच्या पाण्यात वाढ होत असल्याने काही भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम जिल्हा आपत्ती विभागाकडून सुरू आहे.

गडचिरोली शहराजवळ कोटगल गावात बॅरेजचे काम सुरू होते. तेथे तात्पुरत्या स्वरूपात घरे बांधण्यात आली होती. या ठिकाणी २३ कामगार अडकले होते. त्यांनी मदतीची मागणी करताच प्रशासनाकडून महसूल विभाग, पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक मासेमारांनी मदत करून या २३ नागरिकांना बाहेर काढले. तसेच आरमोरी मार्गावरील राजेश इटनकर यांच्या आय फार्म येथेही त्यांचे सहा कामगार अडकले होते. त्यांनी याची माहिती प्रशासनास देताच त्या कामगारांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

विशेष म्हणजे अनेक वर्षांनंतर पुराचे पाणी खरपुंडी नाका पार करून गडचिरोली शहराच्या वेशीच्या आत शिरले आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे. देसाईगंज तालुक्‍यातील स्थिती अधिकच बिकट असून येथील वीजपुरवठा सकाळपासून बंद झाला आहे. हा वीजपुरवठा दोन दिवसांपर्यंत बंद राहिल, अशी चर्चा आहे. विजेअभावी नळाद्वारे पाणीही सोडण्यात आले नाही.

गडचिरोली शहरातही नगर परिषदेचे वैनगंगा नदी काठावर असलेले पंप हाऊस संचालित करणे कठीण झाल्याने पाणीपुरवठा करण्यात आला नाही. २ सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा होणार नसल्याने नगर परिषद प्रशासनाने कळविले आहे. एकूणच पुरामुळे अनेकांच्या घराचे, साहित्याचे नुकसान होण्यासोबतच नागरिकांना विजेअभावी अंधार व पुरातही पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहेत. 

हे मार्ग आहेत बंद... 

१) आरमोरी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग एनएच - 353 ( पाल नदी) आणि (गोदावरी नदी) तसेच आरमोरी-ब्रह्मपुरी (वैनगंगा नदी) 
२) गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग एनएच 353 सी (शिवणी नाला, गोविंदपूर नाला, पोहार नदी) 
३) आरमोरी-रामाळा मार्ग (गाढवी नदी) 
४) बामणी-आष्टी राष्ट्रीय महामार्ग एनएच - 353 बी (वैनगंगा नदीच्या पुलावर पाणी) 
५) अहेरी -वेंकटापूर-बेजुरपल्ली मार्ग राज्य महामार्ग एसएच- 370 ( गडअहेरी नाला, वट्रा नाला) 
६) वडसा -लाखांदूर मार्ग (वैनगंगा नदी) 
७) चामोर्शी -मार्कंडा मार्ग (शंकरपूर नाला, मार्कंडा नाला) 
८) हरणघाट-चामोर्शी मार्ग एसएच -370 ( दोडकुली नाला) 
९) भेंडाळा-बोरी-अनखोडा मार्ग (अनखोडा नाला) 
१०) फोकुर्डी- मार्कंडा मार्ग (फोकुर्डी नाला) 
११) खरपुंडी-दिभना-बोदली मार्ग (कठाणी नदी) 
१२) आरमोरी-अंतरजी-जोगीसाखरा मार्ग (गाढवी नदी) 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com