
कोविडमुळे मृत्यू झालेल्या पित्याचा मृतदेह स्वीकारण्याची त्याची मानसिकता दिसत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अखेरचा उपाय म्हणून पोलिसांच्या भाषेत त्याची समजूत काढली. मृतदेह न स्वीकारल्यास पोलिस बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करतील.
अमरावती : कोरोना विषाणूची लागण होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. वडिलांचा कोविडमुळे मृत्यू झाल्यानंतर मुलाने मृतदेह स्वीकारण्यासाठी चक्क चार दिवस लावल्याची धक्कादायक घटना शहरात उजेडात आली.
दर्यापूर तालुक्यातील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचारादरम्या कोविड रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने त्याच्या एकुलत्या एक मुलाला घटनेबाबत माहिती दिली. मृतदेह त्याच दिवशी सायंकाळी इर्विन रुग्णालयाच्या शवागारात ठेवला. तीन दिवस होऊनसुद्धा अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेण्यासाठी मुलगा इर्विनमध्ये आलाच नाही.
इर्विनच्या पोलिसांनी माहिती देण्यासाठी वारंवार त्याच्याशी संपर्क केला. सुरुवातीच्या संभाषणानंतर मुलाने मोबाईल स्वीचऑफ करून ठेवला. इर्विन चौकीतील पोलिसांचा संपर्क सतत सुरूच होता. मुलगा येत नसल्याचे बघून मृत्यूचा मेमो कोतवाली ठाण्यात दिला गेला. चौथ्या दिवशी शुक्रवारी दुपारी पुन्हा इर्विन चौकीतील पोलिसांनी मुलाच्या मोबाईलवर संपर्क साधला तेव्हा त्याने फोन उचलला असता मृतदेह ताब्यात घेण्यासाठी इर्विनमध्ये येण्यास सांगितले.
कोविडमुळे मृत्यू झालेल्या पित्याचा मृतदेह स्वीकारण्याची त्याची मानसिकता दिसत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अखेरचा उपाय म्हणून पोलिसांच्या भाषेत त्याची समजूत काढली. मृतदेह न स्वीकारल्यास पोलिस बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करतील.
अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?
पित्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळविणे कठीण जाईल, यासह विविध मुद्दे सांगितल्याने अखेर तो तयार झाला. चौथ्या दिवशी सायंकाळी मुलगा अन्य काही लोकांना घेऊन इर्विनच्या शवागारासमोर आला. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून मृतदेह मुलाच्या स्वाधीन केला. जन्म देणाऱ्या पित्यावर त्याच्या मृत्यूनंतर असा प्रसंग ओढविल्याबद्दल पोलिसांनी देखील दु:ख व्यक्त केले.
सकारात्मक मानसिकता ठेवा
मृत्यू कुणाचाही होवो वाईटच वाटते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांची मानसिकता बदलली आहे. कोविडने मृत्यू झालेल्यांचा मृतदेह स्वीकारण्यासाठी मानवतेच्या दृष्टीने विचार करावा. सकारात्मक मानसिकता ठेवा.
- डॉ. श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती
मदतीचा हात पुढे करा
प्रशासनावर प्रत्येक जबाबदारी ढकलणे योग्य नाही. कठीण परिस्थितीत मदतीचा हात पुढे करा. कोविडमुळे मृत्यू झालेल्या काहींवर नातेवाईक न आल्याने सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करावे लागतात.
- डॉ. सीमा नैताम,
आरोग्य अधिकारी, महापालिका
संपादन - नीलेश डाखोरे