
15 व 20 जानेवारी 2021 अशा दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यांतील मतदान 80 टक्के नोंदविले गेले होते. जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील 320 ग्रामपंचायतींमधील एकूण मतदार 4 लाख 76 हजार 774 होते.
गडचिरोली : संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल शुक्रवार (ता. 22) लागला. त्यामुळे आता जिल्ह्यातील 320 ग्रामपंचायतींवर नवे कारभारी निवडून आले असून दिवसभर सर्वच राजकीय पक्षांमध्ये आपलाच झेंडा जास्त ग्रामपंचायतींवर फडकल्याचे दावे करण्यात येत होते.
15 व 20 जानेवारी 2021 अशा दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यांतील मतदान 80 टक्के नोंदविले गेले होते. जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील 320 ग्रामपंचायतींमधील एकूण मतदार 4 लाख 76 हजार 774 होते. यात 1 लाख 96 हजार 940 पुरुष व 1 लाख 84 हजार 546 महिलांचा समावेश होता. ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी प्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यांत शुक्रवारी सकाळी 10 वाजेपासून सुरू झाली.
हेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या...
कोरची- तहसील कार्यालय, कोरची (सभागृह), कुरखेडा- तहसील कार्यालय, कुरखेडा, देसाईगंज- तहसील कार्यालय, देसाईगंज (इमारतीच्या आतील परिसरात), आरमोरी- नवीन प्रशासकीय भवन, आरमोरी, खोली क्र.210, गडचिरोली- क्रीडा प्रबोधिनी, पोटेगाव रोड, गडचिरोली, धानोरा- महसूल मंडळ, ( आतील पटांगण) येथे धानोरा, चामोर्शी- केवळराम हरडे महाविद्यालय मूल रोड, चामोर्शी, मुलचेरा- तहसील कार्यालय मुलेचरा येथील सभागृहात, अहेरी- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागेपल्ली, एटापल्ली- महसूल मंडळ एटापल्ली ( आतील परिसर ), भामरागड- तहसील कार्यालय, भामरागड ( नाझर कक्ष ), सिरोंचा- महसूल मंडळ सिरोंचा ( खुल्या आवारात व सभागृहात) या ठिकाणी मतमोजणी झाली.
मतमोजणी केंद्राच्या परिसरात निवडणुकीसाठी उभे उमेदवार, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. पण अशी गर्दी होईल हे लक्षात घेत तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काहीजणांनी विजयी उमेदवारासाठी हारतुरे, वाजंत्री, फटाक्यांची व्यवस्था केली होती. पण मतदान केंद्राच्या आवारात अशा प्रकारांना मनाई असल्यामुळे केवळ हार घालून अभिनंदन करून मग गावात जाऊन अनेकांनी आनंद साजरा केला.
कोरची तालुक्यात महाविकास आघाडीने बाजी मारल्याचा दावा करण्यात आला, सिरोंचा तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सरशी झाल्याचे सांगण्यात येत आहे, चामोर्शी तालुक्यात भारतीय जनता पक्ष पुढे असल्याचे सांगण्यात येत होते, गुरवळा गावात शेतकरी कामगार पक्षाने वर्चस्वाचा दावा केला. एकूणच तालुका, ग्रामपंचायतनिहाय दावे, प्रतिदाव्यांना पुढील काही दिवस ऊत येणार आहे.
हेही वाचा - वय अडीच वर्ष अन् 'इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद, गुण ऐकूण तुम्हीही व्हाल...
आव्हान विकासाचे
एरवी ग्रामपंचायत निवडणुकांना सतत विरोध करणारे नक्षलवादी यंदा शांतच होते. शिवाय पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तामुळेही त्यांना काही करता आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडल्या. आता निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांचे पुढील काही दिवस आनंदोत्सव साजरे करण्यात जाणार आहेत. पण, यातील बहुतांश ग्रामपंचायती अनेक समस्यांनी ग्रस्त असून कित्येक गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, अशा मूलभूत सुविधाही नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या नव्या कारभाऱ्यांपुढे ग्रामविकासाचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान ते कसे पेलतात हे येणारा काळ ठरवेलच.
संपादन - अथर्व महांकाळ