नक्षली हल्ल्यात जवानांचे बळी कधीपर्यंत?; हुतात्मा जवानाच्या पत्नीचा प्रश्‍न

jawan
jawan

देऊळगावराजा : नक्षल प्रभावित भागात नक्षली हल्ल्यात जवानांचे बळी जात आहेत. त्यांच्या पत्नी विधवा तर मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवते. हे कधीपर्यंत चालणार, याचा अंत नाही का? असा संतप्त प्रश्‍न माओवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सर्जेराव खार्डे यांच्या पत्नीने आज (ता. 4) प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या धोरणाविरुद्ध रोष व्यक्त केला.

तालुक्यातील आळंद येथील सर्जेराव एकनाथ खार्डे हा गडचिरोली पोलिस विभागात कार्यरत असलेला जवान हुतात्मा झाला. त्यानंतर हुतात्मा जवानांचे पार्थिव नातेवाइकांच्या सुपूर्द करेपर्यंत पोलिस प्रशासन आणि राज्य शासनाने दर्शविलेल्या दिरंगाईविषयी वीरपत्नी स्वाती सर्जेराव खार्डे आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत होत्या.

नक्षलवाद असो की आतंकवाद यामध्ये जवानांचे बळी जातात. देशासाठी प्राणांची आहुती देणार्‍या जवानांबद्दल शासन व प्रशासनातर्फे जो कळवळा दाखविला जातो. प्रत्यक्षात मात्र याची विपरीत परिस्थिती मी अनुभवली, घटना घडल्यानंतर तब्बल 24 तासानंतर पार्थिव शरीर नातेवाइकांना मिळाले ते बंद पेटीत. नक्षलवादी हल्ल्यात पोलिस शिपाई यांचाच बळी जातो. वरच्या पोस्टवर असलेले अधिकारी मागेच राहतात. हा भेदभाव नाही का? अधिकार्‍यांना जीव आहे, पोलिस शिपाई यांना जीव नाही का? त्यांची मुले उघडी पडतात, पत्नी विधवा होते. आयुष्यभर या संवेदना झेलायच्या कशा? शासन मदत देईल मात्र माझा पती परत करणार का? माझ्या मुलीला त्यांचे पप्पा परत थोडे मिळणार? असा भावनिक प्रश्‍न वीरपत्नी आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी विचारत होती. नक्षलवाद्यांनी 15 जवान मारले त्याचा बदला म्हणून आपण नक्षलवादी मारू, मात्र हे सुरूच राहणार आहे का? आज माझा पती गेला उद्या इतर जवानांच्या पत्नी विधवा होऊ नये. म्हणून शासनाने ठोस निर्णय घेऊन ही लढाई संपुष्टात आणण्याचे प्रयत्न करावे.

पोलिस भरतीच्या वेळेस पोलिस प्रशासन ज्या नियमांचे काटेकोर पालन करते. जवान हुतात्मा झाल्यानंतर त्याच्याविषयी पोलिस प्रशासनाच्या संवेदना बोथट होतात, असा आरोप त्यांनी यावेळी केला. पोलिस प्रशासनात सेवा करण्याची इच्छा आहे का, असा प्रश्‍न प्रसारमाध्यमांनी विचारला असता माझ्या चिमुकलीची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोडली आहे. डोळ्यासमोर अख्खं आयुष्य शासनाने दिलेल्या मदतीवर जगणे शक्य नाही. त्यासाठी कोणत्याही विभागात शासकीय सेवा करायला मी तयार आहे. मला पोलिस दलात काम करण्याचा आणि देशासाठी लढा देण्याविषयीचा नक्कीच अभिमान राहील, असे उत्तर त्यांनी दिले. पती जिवंत असताना त्यांची वर्दी घातल्यानंतर मला खूप अभिमान वाटायचा. मात्र स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलेल्या वर्दीचा अभिमान वेगळाच अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

चिमुकली नयनाचा टाहो 
हुतात्मा जवानाच्या पत्नी स्वाती खार्डे प्रसारमाध्यमांशी आपल्या संवेदना व्यक्त करीत होत्या. सभोवताली गावातील महिलांसह नातेवाईक बसलेले होते. सोबत चिमुकली नयना आपल्या आईच्या मांडीवर बसलेली होती. तेवढ्यात मम्मी माझे पप्पा कधी येणार, असा प्रश्‍न तिने आपल्या आईला विचारून टाहो फोडला आणि स्वातीसह उपस्थित महिलांसह नातेवाईक गहिवरले.

पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा 
चिखली तालुक्यातील जवान हुतात्मा झाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी सिंदखेडराजा तालुक्यातील चोरपांग्रा येथील एक जवान हुतात्मा झाले. या हुतात्मा जवानांच्या कुटुंबाच्या सांत्वन करण्यासाठी पालक मंत्री मदन येरावार यांना अद्याप वेळ भेटला नाही. गडचिरोली नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या मेहकर व देऊळगावराजा तालुक्यातील पोलिस जवान शहीद झाल्याची दुःखद घटना घडली. चार दिवस उलटले तरीही पालकमंत्री आले नाही. आपली नैतिक जबाबदारीचा विसर पालकमंत्र्यांना पडला असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते मनोज कायंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com