
गडचिरोली : पोलिसांनी हस्तगत केलेले नक्षल साहित्य.
गडचिरोली: जिल्ह्यामध्ये घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी नक्षलवादी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर करतात. कुरखेडा उपविभागाअंतर्गत पुराडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जामटाेला, बंजारी रिठ जंगल परिसरात नक्षल्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
हेही वाचा: गडचिरोलीत कमांडोंकडून 26 नक्षलवादी ठार; पाहा व्हिडीओ
नक्षलवादी स्फोटक साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवतात व जंगल परिसरातील जमिनीत गोपनियरित्या पुरून ठेवतात. काही ठिकाणी रस्ते तसेच सुरक्षा दलांना धोका होऊ शकेल अशा इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्य व दारूगोळा इत्यादी ते गोपनियरित्या जमिनीत पुरून ठेवतात. बुधवार (ता. २३) उपविभाग कुरखेडाअंतर्गत येत असलेल्या पुराडा पोलिस स्टेशन हद्दीमध्ये जामटोला, बंजारी रिठ जंगल परिसरात कोरची एलओएस, टिपागड एलओएस व कंपनी क्र. ४ च्या नक्षलवाद्यांनी पोलिस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने, मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे., अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर यांच्या नेतृत्वात नक्षलविरोधी अभियानाचे आयोजन करून विशेष अभियान पथक व बी.डी.डी.एस. पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी गोपनियरित्या जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्र व स्फोटकांचा साठा शोधून काढण्यात जवानांना यश आले.
हेही वाचा: Gadchiroli : अखेर पेपरमील परिसरातील बिबट्या जेरबंद
या साठ्यात जिवंत कुकर बॉम्ब १ नग, कुकर ४ नग, जिवंत डेटोनेटर १ नग, जिलेटीन (जेली) ४ नग, स्प्रिन्टर लोखंडी तुकडे ६ नग, गन पावडर ४५ ग्रॅम, मोबाईल चार्जर स्विच १ नग, तुटलेला मोबाईल चार्जर १ नग, नक्षल शर्ट १ नग, नक्षल पॅन्ट १ नग व नक्षल पुस्तके तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आले आहे. यापैकी जिवंत कुकर बॉम्ब हे बीडीडीएस (बाॅम्ब शाेधक व नाशक) पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने यशस्वीरित्या जागेवरच नष्ट करण्यात आले. इतर साहित्य गडचिरोली येथे आणण्यात आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कारवाई सुरू आहे. टिसीओसी ( Tactical counter offensive campaign) सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर हे साहित्य हस्तगत केल्यामुळे या भागात नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या लक्षात आलेले आहे की गडचिरोली पोलिस दलाची नजर आपल्यावर आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना वेठीस धरून बळजबरीने टिसीओसी सप्ताह पाळायला भाग पाडणे नक्षलवादयांना आता अडचणीचे ठरणार आहे. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक अंकित गोयल. यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथक व बीडीडीएस पथकाचे कौतुक केले आहे. तसेच जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे सांगितले आहे.
Web Title: Gadchiroli Naxal Literature Seized Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..