नक्षल्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी अन्‌...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 March 2020

गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणीत जवानांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, जवानांनी माओवाद्यांचा कट उधळून लावत माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यामुळे नक्षलवादी जंगलात पळून गेले.

गडचिरोली : मोठा घातपात घडवून आणण्याच्या हेतूने माओवाद्यांनी पुरून ठेवलेला भूसुरुंग पोलिसांनी निकामी करीत त्यांचा कट उधळून लावला. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठी दुर्घटना टळली.

पोलिस मदत केंद्र हेडरी हद्दीतील बोडमेटा जंगल परिसरात पोलिस जवान व सीआरपीएफ बटालियन 191 कंपनीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. दरम्यान, माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणीत जवानांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, जवानांनी माओवाद्यांचा कट उधळून लावत माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.

घटनास्थळावरून पळ काढला

जवानांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना घटनास्थळावर माओवाद्यांनी आणखी एक भूसुरुंग पेरून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिस जवानांनी समयसूचकता दाखवत हा भूसुरुंग घटनास्थळावरच निकामी केला.

हेही वाचा : शिक्षिकेने गाठला कळस, होमवर्क केला नाही म्हणून चिमुकल्या विद्यार्थिनीला....

नक्षल साहित्य जप्त

त्याचबरोबर जवानांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले. पोलिस मदत केंद्र हेडरी तसेच सीआरपीएफ 191 बटालियनच्या जवानांच्या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gadchiroli naxalite Bhoosurung police