नक्षलवाद्यांशी लढणारे हात सरसावले बेरोजगारांसाठी, १४० तरुणांना दिला रोजगार

मिलिंद उमरे
Sunday, 29 November 2020

जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात गडचिरोली पोलिस दल व एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद यांच्या वतीने नोकरीप्राप्त उमेदवारांना शनिवार (ता. 28) नियुक्ती प्रमाणपत्र देत त्यांचा सत्कार करण्यात आला.

गडचिरोली : देशातील सर्वांत मागास व नक्षलग्रस्त जिल्ह्यांपैकी एक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाखालोखाल भेडसावणारी मोठी समस्या बेरोजगारी आहे. त्यामुळे आता नक्षलवादासोबत लढतानाच बेरोजगारीसोबतही दोन हात करण्याचा निर्धार पोलिस विभागाने केला आहे. त्यातूनच पोलिसांनी जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील १४० बेरोजगार तरुणांना हैदराबाद येथे रोजगार मिळवून दिला आहे.

हेही वाचा - तब्बल २२ वर्षानंतरही कर्मचाऱ्यांना नाही संगणकाचे ज्ञान...

जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात गडचिरोली पोलिस दल व एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद यांच्या वतीने नोकरीप्राप्त उमेदवारांना शनिवार (ता. 28) नियुक्ती प्रमाणपत्र देत त्यांचा सत्कार करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्याला नक्षलवादाचा कलंक लागला आहे. नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला विरोध करून त्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रयत्न करतात. तसेच शिक्षणाच्या प्रवाहात असलेल्या अनेक विद्यार्थ्यांची दिशाभूल करून त्यांना दलममध्ये भरती करून त्यांचे भविष्य उद्‌ध्वस्त करतात. तसेच तरुणांनी सरकारी नोकरीपासून दूर राहावे, यासाठी त्यांना ठार मारण्याच्या धमक्‍या देतात. त्यामुळे अतिदुर्गम भागातील अनेक तरुण गुणवत्ताधारक असूनही रोजगारापासून वंचित आहेत. अशा बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे करून त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी गडचिरोली पोलिस विभागाने हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाने रोजगार मेळावा ऍप तयार केले आहे. या ऍपच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांनी गडचिरोली पोलिस दलाकडे आपली नाव नोंदणी केली आहे.

हेही वाचा - यवतमाळमध्ये १४८० क्षयरोग, तर १५८ कुष्ठरोगाचे रुग्ण; क्षयरोग्यांना उपचारासाठी दरमहा ५०० रुपये

गडचिरोली पोलिस दलाच्या पुढाकाराने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय जिमलगट्टा, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, गडचिरोलीअंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम भागांतील 140 बेरोजगार तरुणांना हैदराबाद येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गडचिरोली पोलिस दलाच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे अतिदुर्गम भागातील तरुणांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून रोजगार मिळालेल्या या सर्व 140 तरुणांनी व त्यांच्या कुटुंबांनी गडचिरोली पोलिस दलाचे आभार मानले आहेत. सर्व रोजगारप्राप्त उमेदवारांचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अपार पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, पर पोलिस अधीक्षक समीर शेख, समय्या मुंडे, एम्स प्रोटेक्‍शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमीटेड, हैदराबादचे संचालक मल्लेश यादव प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी जिमलगट्टा, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, गडचिरोली व या उपविभागांतील पोलिस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

हेही वाचा - स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही गावाला जोडणारा...

नवे आव्हान, नवी आशा -
गडचिरोली पोलिस दल तळहातावर प्राण घेऊन नक्षलवाद्यांशी निकराची झुंज देत असताना स्थानिकांच्या समस्या सोडविण्यासाठीही जिवाचे रान करत आहेत. यातील महत्त्वाच्या बेरोजगारीच्या समस्येला पोलिस दलाने आव्हान म्हणून स्वीकारले असून हे नवे आव्हान लीलया पेलण्यात येत आहे. ही समस्या सुटल्यास नक्षल्यांच्या बंदुका हातात धरण्याची शक्‍यता असलेल्या रिकाम्या तरुण हातांना हक्‍काचे काम मिळेल. कामाचे दाम मिळेल आणि त्यांचे जीवन सुखकर होईल, ही नवी आशा सर्वांच्या मनात निर्माण होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gadchiroli police department gives job to 140 youth