गडचिरोलीच्या सुवर्णकन्येने घेतली राज्यपालांची भेट, राजभवनातून आले होते निमंत्रण

मिलिंद उमरे
Wednesday, 28 October 2020

विशेष म्हणजे राजभवनात राज्यपालांची भेट घेणारी ती गडचिरोलीची पहिलीच खेळाडू ठरली आहे. राजभवनातून आलेले निमंत्रण स्वीकारत एंजलने राज्यपाल कोश्‍यारी यांच्याशी स्कॉय मार्शल आर्टमधील विविध संधी, विकास तसेच जिल्ह्यातील क्रीडा समस्यांवर चर्चा केली.

गडचिरोली : अगदी बालवयात स्कॉय मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारातील राष्ट्रपती पुरस्कार विजेती तसेच अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत असंख्य सुवर्णपदके मिळवणारी गडचिरोलीची सुवर्णकन्या एंजल देवकुले हिने मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांची भेट घेतली. तसेच जिल्ह्यातील क्रीडा समस्यांविषयी त्यांच्याशी अर्धा तास सविस्तर चर्चा केली.

हेही वाचा - शेपूट नसलेला श्वान बघितला ना? कधी प्रश्न पडला, का...

विशेष म्हणजे राजभवनात राज्यपालांची भेट घेणारी ती गडचिरोलीची पहिलीच खेळाडू ठरली आहे. राजभवनातून आलेले निमंत्रण स्वीकारत एंजलने राज्यपाल कोश्‍यारी यांच्याशी स्कॉय मार्शल आर्टमधील विविध संधी, विकास तसेच जिल्ह्यातील क्रीडा समस्यांवर चर्चा केली. या भेटीत गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंसाठी विविध सोयी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांना निवेदन देण्याची विनंती तिने केली. राज्यपाल कोश्‍यारी यांनी तिच्या क्रीडागुणांचे कौतुक करत तिच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले.

हेही वाचा - दिवसा वनभ्रमंती, रात्रीला मचाणावर जागरण; तेव्हा कुठं पिंजऱ्यात अडकला वाघोबा

गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस येथील सुरक्षेसाठी उत्कृष्ट काम करत असल्याचे तिने राज्यपालांना आवर्जून सांगितले. राज्यपालांनीही गडचिरोली पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच राज्यपाल कोश्‍यारी यांनी एंजलच्या कार्याचे कौतुक व सत्कार करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी एंजलचे प्रशिक्षक संदीप पेदापल्ली, महाराष्ट्र स्कॉय असोसिएशनचे अध्यक्ष मजहर खान, एंजलची आई व आंतरराष्ट्रीय खेळाडू अवंती गांगरेड्डीवार आदी उपस्थित होते.

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gadchiroli sky martial arts player angel deokule meet governor koshyari in mumbai