esakal | "कामचुकार अधिकाऱ्यांनो आता तुमची गय करणार नाही".. कोणी दिला हा इशारा.. वाचा सविस्तर  
sakal

बोलून बातमी शोधा

Gadchiroli ZP president took marathon meeting of officers

पंचायत समितीच्या निर्मितीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष ,उपाध्यक्ष यांनी पहिल्यांदाच 9 तास घेतलेल्या विकासकामांच्या आढाव्यात विकास कमी व भ्रष्टाचार जास्त दिसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नाराजी व्यक्त करून अधिकारी, कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली

"कामचुकार अधिकाऱ्यांनो आता तुमची गय करणार नाही".. कोणी दिला हा इशारा.. वाचा सविस्तर  

sakal_logo
By
नंदकिशोर वैरागडे

कोरची (जि. गडचिरोली):  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आपल्या कोरची तालुका दौऱ्यादरम्यान तब्बल नऊ तासांची मॅरेथॉन आढावा बैठक घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्ती करीत कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय करणार नाही, अशी तंबी दिली.

पंचायत समितीच्या निर्मितीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष ,उपाध्यक्ष यांनी पहिल्यांदाच 9 तास घेतलेल्या विकासकामांच्या आढाव्यात विकास कमी व भ्रष्टाचार जास्त दिसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नाराजी व्यक्त करून अधिकारी, कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. गेल्या सहा वर्षांपासून कोरची पंचायत समिती आमदारांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाणारी विकास नियोजन आढावा सभा घेण्यात न आल्याने कोरची पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांनी पंचायत समितीला भ्रष्टाचाराचा अड्डाच केल्याचे चित्र अध्यक्षांनी घेतलेल्या आढावा सभेत दिसू लागले होते..

अधिक माहितीसाठी - कुंभ मेळा संपल्यानंतर नागा साधू कोठे जातात? 

पंचायत समिती ही ग्रामीण भागातील विकासाचे केंद्र बिंदू असते. पण कोरची पंचायत समिती भ्रष्टाचाराचे केंद्र बिंदू ठरल्याची टीका करण्यात आली. केंद्र सरकारने गाव स्वच्छ तर देश स्वच्छ होईल व आरोग्याची निगा राखता येईल यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रामस्वच्छता, हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतागृह बांधकामासाठी निधी दिला पण स्वच्छतागृहाचे बांधकाम न करता निधी वाटप केल्याचे दिसून आले. ज्या लोकांनी बांधकाम केले त्यांना स्वच्छतागृह बांधकामाचे पैसे काढण्यासाठी पैशाची मागणी केली जात आहे. 

त्यामुळे हागंणदारीमुक्तीची घोषणा फक्त कोरची पंचायत समितीच्या 29 ग्रामपंचायतींमध्ये कागदोपत्रीच आहे. अभियान राबविण्याची संकल्पना केंद्र सरकार गेल्या पाच वर्षांपासून राबवीत आहे. पण कोरची पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या बाबीकडे ग्रामपंचायत स्तरावर जाऊन स्वच्छतेची कधीही पाहणी केली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर झालेला खर्च लाखोंच्या घरात असून स्वच्छता मात्र शून्य आहे .गावातील नाली, गटारे आदींची साफसफाई करणे, नाल्यातील पाणी वाहते करणे, संपूर्ण गाव, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे ही कामे करण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च केले पण प्रत्यक्षात मात्र या कुठेही स्वच्छता नाही. 

पंचायत समितीच्या सभागृहात विविध विकासकामांचा आढावा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी कृषी सभापती नानाभाऊ नाकाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, प्रभाकर तुलावी, अनिल केरामी, सुमीत्रा लोहंबरे, पंचायत समिती सभापती श्रावण मातलाम, उपसभापती सुशीला जमकातन, पंचायत समिती सदस्य सदाराम नुरूटी, कचरी काटेंगे, श्‍यामलाल मडावी, परसराम टिकले, मनोज अग्रवाल, राजेश नैताम, किशोर तलमले, गिरिधर तितीरमारे, परमेश्‍वर लोहंबरे, सदरूद्दीन भामानी आदी उपस्थित होते. कोविड 19 बाबत, घरकुल योजना, 14 वा वित्त आयोग, 5 वर्षांचा आराखडा, ग्रामपंचायतीने किती खर्च केला, वैयक्तिक शौचालय बांधकाम, मरेगामध्ये सुरू केलेल्या कामाच्या संदर्भात, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत आढावा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाचा आढावा, सिंचन विहीर, मामा तलाव, कोल्हापुरी बंधारे बांधले, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कामाचा आढावा,13 वने अंतर्गत झालेल्या कामाचा आढावा, 5 टक्‍के पेसा अबंध निधी कामांचा आढावा, अंगणवाडी इमारत बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम दुरुस्ती, शाळा बांधकाम दुरुस्तीबाबत, नवीन ग्रामपंचायत बांधकाम आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. पण सर्व कामे कागदोपत्री दाखवून निधी खर्च करण्यात आले असल्याचे स्पष्ट जाणवत असल्याने या संपूर्ण कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

अध्यक्ष कंकडालवार म्हणाले की, कामचुकारपणा करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. तसेच घरकुलाचे पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच पंचायत समिती सदस्य सदाराम नुरुटी यांनी गटविकास अधिकारी डी. एम. देवरे पंचायत समिती सदस्यांना विश्‍वासात घेतले जात नाही. स्वत:चा मनमानी कारभार करतात. त्यांच्यावर कारवाईचा ठराव चार सदस्यांनी सर्वानुमते मंजूर करून पाठविला. त्यांच्यावर कारवाईची अध्यक्ष कंकडालवार यांनी हमी दिली. या आढावा सभेत पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक, प्रत्येक विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा - वीज ग्राहकांनो लक्ष द्या! अचूक वीजबिल हवंय? मग ५ दिवसांच्या आत हे कराच.. अन्यथा..

गटविकास अधिकाऱ्यांची दांडी

प्रसिद्धीचा हव्यास असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी आढावा सभेला दांडी मारली. क्‍वारंटाईनच्या नावाखाली केलेले कारनामे बाहेर येण्याची शक्‍यता लक्षात घेत त्यांनी दांडी मारल्याची चर्चा या बैठकीत होती. होम क्वारंटाईन असताना सभेच्या आधी तीन दिवसांपूर्वी क्‍वारंटाईन कालावधी पूर्ण होण्याआधी गावात व बाहेर गावी ते मुक्तसंचार करीत होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष काय कार्यवाही करणार याकडे तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

संपादन- अथर्व महांकाळ