esakal | चार राज्यात गाडगेबाबा कॅन्सर केअर सेंटर
sakal

बोलून बातमी शोधा

cancer

दादरच्या धर्मशाळा ट्रस्टचा पुढाकार ः कर्करोग रुग्णच होतील मॅसेंजर

चार राज्यात गाडगेबाबा कॅन्सर केअर सेंटर

sakal_logo
By
शुभम बायस्कार

अकोला : गाडगेबाबांची दशसुत्री देशभरात पोहोचविण्याचा चंग दादरच्या (मुंबई) धर्मशाळेचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी बांधला आहे. आगामी काळात देशातील चार राज्यात गाडगेबाबा कॅन्सर केअर सेंटर उभारले जाणार आहे. त्यासंदर्भातील हालचाचील सुरु झाल्या असून मुंबईतून कर्करोगातून बरे झालेले रुग्णच त्यांच्या राज्यातील सेंटरवर हे काम पाहणार आहेत, हे उल्लेखनिय. 

देशभरातून महानगरी मुंबईतील टाटा ट्रस्ट हॉस्पिटल येथे कर्करोगावर उपचार करण्यासाठी रुग्ण मोठ्या संख्येने येतात. येथे उपचारार्थ येणाऱ्या गोर-गरीब रुग्णांना मिशन गाडगेबाबा, दादरच्या धर्मशाळा ट्रस्टकडून मोफत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली जाते. मात्र अनेकांना यासंदर्भात माहिती नाही. महानगरी मुंबईत कुठे थांबावे, कर्करोगाच्या उपचारासंदर्भात येथे उपलब्ध असणाऱ्या सोई-सुविधांच्या अनुषंगाने योग्य मार्गदर्शनाचा अभाव असे शेकडो प्रश्‍न रुण व त्यांच्या नातेवाईकांसमोर निर्माण झालेले असतात. त्यामुळे धर्मशाळेच्या या कार्याचा विस्तार करीत मुंबईत येणाऱ्या रुग्णांना कर्करोगाच्या उपचार संदर्भात त्यांच्याच राज्यात मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन, समुपदेशन व्हावे गाडगे बाबांच्या विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी दादरच्या गाडगेबाबा धर्मशाळेचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. लवकरच मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार या राज्यात गाडगेबाबा रुग्ण सहाय्यता केंद्र उभारले जाणार आहे. या केंद्रावर मुंबईत कर्करोगासंदर्भात मिळणारे उपचार, हॉस्पिटलांची उपलब्धता, राहण्याची सुविधा, समुपदेशन यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्यामुळे देशभरातील शेकडो कर्करुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हे वाचा - परीक्षेच्या दिवसांमध्ये पालकांची जबाबदारी


नागरिकांच्या सहकार्यातून केंद्राची सुरुवात
गाडगेबाबा रुग्ण सहाय्यता केंद्र हे तेथील नागरिकांच्या सहकार्यातून सुरु कले जाणार आहे. केंद्रांसाठी चार राज्यात जागाही सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईतून कर्करोगावर मात करुन आपल्या मायदेशी परतलेले रुग्ण येथील केंद्रावर मार्गदर्शन, समुपदेशन करणार आहेत. कॅर्करोग रुग्णांकडूनच रुग्णांना मार्गदर्शन केले जाणार असल्याने निश्‍चितच रुग्णांचे मनोबल उंचविणार आहे.


महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यातून रुग्ण मोठ्या संख्येने कर्करोगावर उपचार घेण्यासाठी मुंबईत येतात. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब ओळखता चार राज्यात रुग्ण सहाय्यता केंद्र सुरु होतील. ज्यातून रुग्णांना मोठी मदत होईल.
-प्रशांत देशमुख, व्यवस्थापक, गाडगे बाबा धर्मशाळा ट्रस्ट, दादर (मुंबई )

loading image