नापास कार्यकर्त्यांना 'प्रोटीन' द्या, पण प्रकृतीची काळजी घ्या

खरबी ः पक्षाचे सदस्यत्वाचा फॉर्म दाखविताना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, शेजारी महापौर नंदा जिचकार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहर भाजपाध्यक्ष प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार रामदास आंबटकर.
खरबी ः पक्षाचे सदस्यत्वाचा फॉर्म दाखविताना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, शेजारी महापौर नंदा जिचकार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहर भाजपाध्यक्ष प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार रामदास आंबटकर.

नागपूर : पूर्व नागपुरातून सर्वाधिक 76 हजार मतांची आघाडी मिळाली. पुढील विधानसभेत एक लाखावर मतांची आघाडी मिळाली पाहिजे. लोकसभा निवडणुकीदरम्यान कुठल्या बूथवर किती आघाडी मिळाली, यावरून कार्यकर्त्यांचे ग्रेडेशन करा. नापास तसेच थर्ड व सेकंड ग्रेड कार्यकर्त्यांना 'प्रोटीन' द्या, परंतु तब्येतीला झेपेल, एवढ्याच प्रोटीनचा प्रयोग करा, असा सल्ला देत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आमदार कृष्णा खोपडे यांना कार्यकर्त्यांची ताकद वाढविण्याचे आवाहन केले. आज भाजपच्या देशव्यापी सदस्य नोंदणी अभियानाला सुरूवात झाली. नागपुरातही सहाही विधानसभा मतदार संघात सदस्यता अभियान पार पडले. खरबीतील सभागृहात पूर्व नागपुरातील भाजप मेळाव्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही सदस्य म्हणून नोंदणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, शहर भाजपाध्यक्ष प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार सुधाकर कोहळे, आमदार रामदास आंबटकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, बंटी कुकडे, ऍड. धर्मपाल मेश्राम, दिव्या धुरडे, निता ठाकरे, पूर्व मंडळाचे अध्यक्ष महेंद्र राऊत, चंदन गोस्वामी यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, भाजप पदाधिकारी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, पूर्व विधानसभा क्षेत्रात पक्ष मजबूत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला गेलेली मते विधानसभेत भाजपकडे कशी वळविता येईल, आपण कुठे कमी पडलो, याचा विचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले. भाजपमध्ये कुठेही गटबाजी नाही, भांडणे नाही. एका परिवाराप्रमाणे कार्यकर्ते काम करीत आहेत. त्यामुळे इतर पक्षाच्या तुलनेत भाजप वेगळा आहे. संकटातील कार्यकर्त्याला मदत करणे हीच आपल्या पक्षाची ताकद आहे. कार्यकर्त्यामुळेच नेते मोठे होतात, हे नेत्यांनीही लक्षात ठेवावे. आमदार खोपडे यांनी पूर्व नागपुरातील विकासाला दिशा दिली. यशस्वी आमदाराचे ते उत्तम उदाहरण आहेत. पक्षाला प्रवीण दटकेच्या निमित्त मेहनती व समर्पित नेतृत्त्व लाभले आहे. सुधाकर कोहळेंच्या नेतृत्वात लोकसभा जिंकली. एकाहून एक सरस नेतृत्व पक्षात असून विधानसभेसाठी जोमाने कामाला लागा, असा मंत्रही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी पूर्व नागपुरातील बूथप्रमुखांचा गौरव करण्यात आला.हुडकेश्‍वर, नरसाळाप्रमाणे खापरीही महापालिका हद्दीत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 2024 मध्ये डिलिमिटेश होईल, असे नमुद करीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठीही आमदार खोपडेंच्या पूर्व नागपुरात जोडून देतो, असे सांगताच सभागृहात हशा पिकला. यावेळी पालकमंत्र्यांनी आता रस्ते खूप झाले, नागपुरात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीवर भर देण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केंद्रीयमंत्री गडकरींना केली. पूर्व नागपुरातून भाजप सदस्य अभियानाला सुरुवात झाली. पूर्व नागपुरात भाजपचे संघटन मजबूत आहे. किंबहुना हे क्षेत्र भाजपचा बालेकिल्ला आहे. सर्वाधिक 24 नगरसेवक पूर्व नागपुरातून आहेत. लोकसभेत सर्वाधिक मतांची आघाडीही याच क्षेत्रातून मिळाली. यंदा सदस्य नोंदणी अभियानात 50 हजार नव्या सदस्यांच्या नोंदणीसाठी प्रयत्न सुरू झाल्याचे आमदार खोपडे यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com