पैसा की निष्ठा? गडकरी, फडणवीसांनी केली चाचपणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

नागपूर - वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेत उभय नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील भाजप सदस्यांना निष्ठेने काम करण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी विधान परिषद निवडणूक लाभ देणारी असते, असा समज असलेल्या काही जुन्या सदस्यांच्या मनाचाही ठाव घेत त्यांना ठणकावल्याचे समजते. 

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपने प्रदेश महासचिव डॉ. रामदास आंबटकर यांना उमेदवारी दिली आहे. 21 मे रोजी निवडणूक होत असून आता ज्वर चढू लागला आहे. सध्या ही जागा भाजपच्याच ताब्यात असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. या पार्श्‍वभूमीवर आज रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या तिन्ही जिल्ह्यांतील नगरसेवक, जि. प. सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत आमदारही उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी सर्वच नगरसेवक, जि. प. सदस्यांना कुठल्याही स्थितीत ही निवडणूक जिंकणे आवश्‍यक असून निष्ठेने कामाला लागण्याचा सल्ला दिला. या निवडणुकीत विजयासाठी मतदारांचे आवश्‍यक संख्याबळ भाजपकडे आहे. मात्र, या तिन्ही जिल्ह्यांतील भाजपच्या ताब्यातील नगरपालिका, महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक विकासकामे थेट सार्वजनिक बांधकाम खात्याकडून होत असल्याने नगरसेवकांत नाराजीचा सूर आहे. या नाराज नगरसेवकांकडून दगाफटक्‍याची शक्‍यता लक्षात घेता आजच्या बैठकीत त्यांना समज देण्यात आल्याचे सूत्राने नमूद केले. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आमदारांना नगरसेवकांकडून निष्ठने काम करून घेण्याच्या तर आपापल्या क्षेत्रातील विकासकामांसाठी विजय आवश्‍यक असल्याने कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या. यावेळी त्यांनी या निवडणुकीचा वेगळा "अर्थ' काढणाऱ्यांच्या मनाचाही कानोसा घेतल्याचे समजते. अशा लोकप्रतिनिधींना त्यांनी ठणकावले. त्यामुळे या निवडणुकीने उत्साहात असलेल्यांचे चेहरे पडल्याचे समजते. या बैठकीत वर्धेचे खासदार रामदास तडस, आमदार नाना श्‍यामकुळे आदींचीही उपस्थिती होती. 

Web Title: Gadkari, Fadnavis did the survey