गडकरी म्हणतात, रसायनमुक्त शेतीसाठी प्रोत्साहित करा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नागपूर : कीटकनाशके व खतांच्या किमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. कमी खर्चात प्रदूषण व रसायनमुक्त शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर : कीटकनाशके व खतांच्या किमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. कमी खर्चात प्रदूषण व रसायनमुक्त शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद करणाऱ्या जागतिक परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थनी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी वैज्ञानिक निवड मंडळ नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहायक महासंचालक डॉ. एस. के. चौधरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, माफसुचे कुलगुरू डॉ. आशीष पातूरकर, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, डॉ. पंजाबराव देशमुख ऑरगॅनिक मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. विलास खर्चे, प्रा. डॉ. मिलिंद राठोड उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, भारतात कीटकनाशक तसेच खतांच्या किमती वाढल्या आहेत. कीटकनाशकांच्या असंतुलित वापराने जमिनीचा पोत खराब होतो. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे नागरिकांमध्ये आरोग्यांच्या समस्या वाढत आहेत. यावर मात करण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. नागरिकांनीदेखील सेंद्रिय भाजीपाला, फळफळावळे सेवन करून त्याबाबत आग्रही असावे. शेतकऱ्यांचा प्रतिएकरी उत्पादन खर्च कमी व्हावा, शेतकरी स्वत: बियाणे, खते यांची निर्मिती करू शकतील. सेंद्रिय शेती परिषदेच्या माध्यमातून असे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले.
कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले, गटशेतीच्या माध्यमातून शेतकरी एकाचवेळी सामूहिकरीत्या किडीचे योग्य व्यवस्थापन करून उत्पादन वाढवू शकतो. दरम्यान, "ऑरगॅनिक हॉल्टिकल्चर' तसेच "कृषी क्षेत्रातील घडी' या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी केले. संचालन सीमा निंबाते यांनी केले. आभार कृषी विकास व संशोधनचे अध्यक्ष डॉ. एस. आर. पोटदुखे यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadkari says, encourage chemical free farming