मनोरंजन केंद्राच्या आड सुरू होते हे धंदे, पोलिस आले आणि...

Gamblers jumped from second floor to escape police
Gamblers jumped from second floor to escape police

अमरावती : फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरावरील अपार्टमेंटमध्ये काही वर्षांपासून मनोरंजन कक्षाच्या नावाने जुगार चालत असल्याच्या संशयावरून फ्रेजरपुरा पोलिसांनी छापा टाकला. त्याचवेळी तिघांनी दुसऱ्या माळ्यावरून खाली उड्या घेतल्याने ते जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.

एका अपार्टमेंटमध्ये खालच्या माळ्यावर सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे निवासस्थान असून, दुसऱ्या माळ्यावर क्रीडा व मनोरंजन केंद्र चालविले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तसे केंद्र चालविण्याचा त्यांच्याकडे अधिकृत परवाना आहे. कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे हे मनोरंजन केंद्र सुरू करण्यासाठी अनुमती मिळाली नाही. त्यामुळे याच मनोरंजन केंद्राच्या आड जुगार भरविला जात असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळाली.

त्यामुळे बुधवारी (ता. एक) रात्री साडेसात ते आठच्या सुमारास प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन मगर यांचे पथक येथे कारवाईसाठी गेले. त्यावेळी मनोरंजन कक्षाच्या दारावर कुलूप होते. आतमध्ये काही लोक जुगार खेळत असल्याच्या संशयामुळे पोलिसांनी आवाज दिला. त्यानंतर थोड्या वेळाने कुलूप उघडायला लावले. परंतु कुलूप उघडेपर्यंत आतमध्ये असलेल्या तिघांनी दुसऱ्या माळ्यावरून खाली उड्या घेतल्या. त्या तिघे जखमी झाले असून, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

पोलिसांनाही काही लोकांनी उड्या मारल्याचा संशय आल्याने ज्या बाजूने उड्या घेतल्या, त्याही दिशेने पाहणी केली असता, कुणीच व्यक्ती जखमी स्थितीत तेथे दिसले नाही. असे प्रभारी पोलिस निरीक्षक श्री. मगर यांनी सांगितले. त्या मनोरंजन कक्षात जुगार सुरू होता काय? याचे काही पुरावे हाती लागले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. पैसे कमविण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय सापडत नसल्याने अवैध धंदे, जुगार आदी प्रकार वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी घटना वाढत असल्याने पोलिसांसमोरील आव्हानही वाढले आहे.

मनोरंजन कक्षाच्या आड जुगार भरतो, अशा तक्रारी आहेत. भविष्यात तसे काही पुरावे आढळल्यास त्या व्यक्तीचा परवानाच रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून पाठविला जाईल.
यशवंत सोळंके, पोलिस उपायुक्त, अमरावती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com