पालकांनो सावधान! आता कंचेही खेळले जातात पैसे लाऊन

मिलिंद उमरे
Thursday, 18 June 2020

 या कंचांचा उपयोग तेव्हा निव्वळ मनोरंजनासाठी व्हायचा. अनेक डाव लावण्याच्या खेळांत फक्त कंचेच डावावर लावले जायचे. पण, आता या निरागस खेळात पैशांचा वापर सुरू झाला आहे. कंच्यांच्या खेळात कंच्यांसोबत पैशांचेही डाव मांडले जात आहेत. अशा प्रकारातूनच पुढे बालकांना जुगाराची सवय लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

गडचिरोली : चकाकणाऱ्या काचेच्या कंचाच्या खेळांची आठवण अनेकांच्या मनात रूंजी घालत असते. आजच्या पिढीतील अनेकांनी बालपणी कंचे नक्‍कीच खेळले असतील. पण, तेव्हाच्या या खेळातही आता पैशांचा वापर होऊ लागल्यामुळे या खेळाच्या निरागसतेला गालबोट लागल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी बालपणातील अनेक खेळांमध्ये कंच्यांचा खेळ अग्रकमावर असायचा. हिरव्या, पिवळ्या, निळ्या, काळ्या अशा विविध रंगी आणि विविध रंगांच्या मिश्रणाच्या चमकणाऱ्या या काचगोळ्या बालकांचे भावविश्‍व समृद्ध करायच्या. त्यात बिद्दी, बेंदाफाक, टय्या आणि अशा अनेक खेळांमधून या गोट्यांचा वापर व्हायचा. अनेक बालकांच्या खिशांमध्ये हे कंचे खुळखुळत असायचे. कित्येकदा कंच्यांच्या वजनाने खिसेसुद्धा फाटायचे.
 या कंचांचा उपयोग तेव्हा निव्वळ मनोरंजनासाठी व्हायचा. अनेक डाव लावण्याच्या खेळांत फक्त कंचेच डावावर लावले जायचे. पण, आता या निरागस खेळात पैशांचा वापर सुरू झाला आहे. कंच्यांच्या खेळात कंच्यांसोबत पैशांचेही डाव मांडले जात आहेत. अशा प्रकारातूनच पुढे बालकांना जुगाराची सवय लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली, तरी तंबाखूजन्य पदार्थांसोबत गांजासारखे अंमली पदार्थही वापरले जातात. शिवाय अनेक ठिकाणी छुपे जुगार अड्डे आहेत. अनेकजण आपले टोळके तयार करून निर्जन ठिकाणी जुगार खेळतात. शहरातील सामसुम भागांत पत्त्याचे डाव रंगतात. काहीजणांनी शेतातील फार्म हाउस, ग्रामीण भागांतील एखाद्या घरात जुगाराची विशेष व्यवस्था केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे पालकांनीही याबद्दल सतर्क होण्याची गरज आहे.

सविस्तर वाचा - कोण म्हणतय, चीनवर बहिष्कार टाका, वाचा

फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा...
कंचे खेळणे वाईट नाही. या खेळातून मुलांमध्ये सांघिक भावना व खिलाडूवृत्ती निर्माण होते. पण, सध्या दिवस कोरोनाचे आहेत. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. पण, कंच्याच्या खेळात मुले मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने या खेळात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gambling is also in a kanche sport