व्हॉट्‌सॲपवरून रंगतोय जुगाराचा खेळ!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

शहरातील अवैध धंदे आता ‘हायटेक’ आणि ‘डिजिटल’ माध्यमातून सुरू झाले आहेत. वरली-मटक्‍याचा जुगार आता चक्‍क व्हॉट्‌सॲपवरून खेळल्या जात आहे. त्यामुळे शहरातील जुगारीसुद्धा हायटेक झाले आहेत.

नागपूर - शहरातील अवैध धंदे आता ‘हायटेक’ आणि ‘डिजिटल’ माध्यमातून सुरू झाले आहेत. वरली-मटक्‍याचा जुगार आता चक्‍क व्हॉट्‌सॲपवरून खेळल्या जात आहे. त्यामुळे शहरातील जुगारीसुद्धा हायटेक झाले आहेत. अशा जुगाऱ्यांवर अंकुश ठेवणे नागपूर पोलिसांसमोर नवीनच आव्हान उभे झाले आहे. 

पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंदे बऱ्यापैकी नियंत्रणात आणले आहे. क्रिकेट सट्‌टेबाजी, अवैध दारूविक्री किंवा जुगारी अड्‌डे यावर अंकुश बसला आहे. मात्र, पोलिसांची भीती लक्षात घेता आता जुगार खेळणाऱ्यांनी ‘हायटेक’ धोरण वापरणे सुरू केले आहे. शहरात गल्लीबोळात किंवा  झोपडपट्‌टीत छोटे-मोठे वरली-मटका अड्‌डे आहेत.

पोलिसांच्या चोरून-लपून वरली खेळल्या जाते. मात्र, गुन्हे शाखेचे उपायुक्‍त नीलेश भरणे यांच्या धास्तीपोटी आता वरली-मटकाही खेळणे मुश्‍कील झाले आहे. त्यावर जुगाऱ्यांनी शक्‍कल लढवत थेट व्हॉट्‌सॲपवरून वरली-मटका खायवाडी आणि लागवाडी सुरू केली आहे. मोबाईलवरून फोटो काढून आकड्याची चिठ्‌ठी पाठवणे आणि कोणत्या आकड्यावर किती पैसे लावले, याचा खाली टेक्‍ट मॅसेज करणे, असा हा फंडा आहे. त्यामुळे खायवाडी करणारे आता अड्ड्यावर बसण्याऐवजी दुचाकीवरून ठरलेल्या चौकात उभे राहतात. लागवाडी करणारे थेट चिठ्‌ठी पाठवून जुगार खेळतात. हा फंडा पोलिसांच्या लक्षात आला आहे. मात्र, छापे घालण्यात तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे पोलिसांना हायटेक जुगार नियंत्रणात आणण्यास अडचणीचे ठरत आहेत. मात्र, या फंड्यामुळे खायवाडी-लागवाडी करणाऱ्यांना जुगार खेळण्यासाठी रान मोकळे झाले आहे.

विश्‍वासावर चालतो धंदा
लागवाडी करणारा व्हॉट्‌सॲवरून ‘आकडा आणि पैसे’ असा मॅसेज पाठवितो. त्यावर खायवाडी करणारा ‘कल्याण, ओपन, क्‍लोज, मुंबई’ असे लिहिलेल्या सट्‌टापट्‌टीवर लिहून परत पाठवतो. जर आकडा लागला तर केवळ मोबाईलमधील सट्‌टापट्‌टीचा फोटो दाखवून पैसे दिल्या जाते. हा सर्व व्यवहार केवळ विश्‍वासावर चालतो. 

वरली-मटक्‍याचे डिजिटल पेमेंट
आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. त्यामध्ये गुगल पे, फोन पे अशा डिजिटल पेमेंट सिस्टिम ॲपचा वापरही सामान्य लोक करीत आहेत. त्याचाच गैरफायदा जुगार खेळणाऱ्यांनी घेतला असून वरली-मटक्‍याचे पैसे थेट पेमेंट ॲपवरून देत आहेत. त्यामुळे पोलिसांना छापा घालणे आणि जप्ती दाखवणे अडचणीचे झाले आहे.

Web Title: Gambling on whatsapp in nagpur