मूर्ती बनविण्यापेक्षा जागा भाड्याने देण्याकडे कल

राघवेंद्र टोकेकर
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

नागपूर : आकर्षक मूर्ती खरेदीकडे नागरिकांचा कल असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मागणी वाढत आहे. मातीच्या मूर्तींची मागणी दिवसेंदिवस कमी होत असल्याने चितारओळीतील मूर्तिकारांनी गणपती बनविणेच सोडले. मूर्ती बनवून विकण्यापेक्षा जागा भाड्याने दिल्यास अधिक फायदा होतो. गणपतीच्या दिवसांमध्ये अवघी चार माणसे झोपतील एवढ्या जागेचे दर लाखाच्या घरात असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

गणेशोत्सव दोन दिवसांवर असल्याने बाजारात चैतन्य संचारले आहे. नागपुरातील चितारओळ केवळ नागपूरपुरती मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रात येथील मूर्तींची ख्याती आहे. परंतु, सध्या या प्रसिद्ध गल्लीला प्लास्टर ऑफ पॅरिसचे ग्रहण लागल्याचे दिसते. पिढ्यानपिढ्यांपासून छोट्या गणरायाची मूर्ती बनविणारे केवळ सहा कुटुंबच चितारओळीत आहेत. उर्वरित विक्रेते आले कुठून, हा प्रश्‍न पडतो. सध्या चितारओळीतील नागरिकांना गणेशमूर्ती बनवून विकण्यापेक्षा जागा भाड्याने देणे फायद्याचे ठरत असल्याचे येथील मूर्तिकाराने सांगितले. अवघ्या शंभर चौरसफुटांच्या जागेसाठी आगाऊ विक्रेते ऐंशी हजार ते एक लाख रुपयांचे भाडे देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत माहिती घेतली असता, मूर्तिकाराने संपूर्ण गणित समजावून सांगितले. चितारओळीतील एक विक्रेता आठशे ते हजार गणेशमूर्ती विकतो. एका मूर्तीची सरासरी किंमत हजार रुपये. म्हणजेच एका विक्रेत्याचा व्यावसाय दहा लाखांच्या घरात आहे. व्यावसायातील सगळा खर्च वगळता सरासरी चार लाखांचे उत्पन्न एका विक्रेत्याचे असते. त्यासाठी चितारओळीत जागा भाड्याने घेण्यासाठी एक लाख भाडे देण्यासही विक्रेते तयार असतात. दुसरीकडे पीओपीची मूर्ती विकणारे विक्रेते चितारओळीत वाढत असल्याने, येथे मूर्ती बनवून विकणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. सुमारे दोन महिने मेहनत घेऊन, तयार झालेल्या मूर्ती जर विकल्याच जात नसतील, तर त्यापेक्षा जागा भाड्याने देऊन, जादाचा फायदा करून घेण्यात चितारओळीतील स्थानिक समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh murti story in nagpur