घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

नागरीकांच्या आरोग्याकरीता नगर पालिका कटीबध्द आहे. शहरातील साफसफाईची कामे नियमीत न करणाऱ्या कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- अजितकुमार डोके, मुख्याधिकारी

नांदुर : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील खुर्द परीसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे नगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परीणामी नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.

अस्वच्छतेमुळे अनेक आजार फैलावतात. सध्या स्वाईन फ्लू सारख्या जीवघेण्या आजाराने डोके वर काढलेले आहे. त्यामुळे नियमीत साफसफाई करून परीसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. मात्र नगर पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होताना दिसते. नांदुरा खुर्द मधील नाल्या अनेक दिवसापासून साफ करण्यात आलेल्या नाहीत. कर्मचारी कामावर येत नाहीत. परीणामी जागोजागी कचऱ्याचे ढिग साचलेले आहेत.

या भागातील नागरीकांनी आरोग्य निरीक्षक महादेव हिंगणकार यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या मात्र ते दखल घेत नसल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. कचरा उचलण्याचे काम एका ठेकेदारास देण्यात आले असले तरी त्याच्याकडून नियमीत कचरा उचलण्यात येत नाही. नांदुरा खुर्द परीसरात तर गेल्या अनेक दिवसापासून साफसफाई झाली नसून कामात दिरंगाई करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी या भागातील नागरीकांना केली आहे.

 

Web Title: garbage issue in nandur