गॅस सिलिंडर दरवाढीचा भडका; गृहिणींचे बजेट कोलमडले

file photo
file photo

भंडारा : शहरात इंधनासाठी केरोसीन व लाकडे मिळत नसल्याने शेगडी व चूल केव्हाच कालबाह्य झाली. गॅस सिलिंडर वापरणे सोयीचे असल्याने सर्वसाधारण व्यक्तीच्या घरातही गॅसचा वापर केला जातो. सलग चार महिन्यांपासून ही दरवाढ सुरू असून, ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान 105 रुपयांनी सिलिंडर महागले. त्यामुळे सामान्य कुटुंबातील नागरिकांची होरपळ सुरू आहे.
एकट्या भंडारा शहरात सहा ते सात गॅस एजन्सी आहेत. तालुक्‍याच्या ठिकाणी व ग्रामीण भागातही स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. ग्रामीण भागात वृक्षतोडीवर नियंत्रण मिळावे. महिलांना चुलीपासून होणाऱ्या धुरापासून मुक्ती मिळावी. त्यांचे आरोग्य सुधारावे यासाठी उज्ज्वला योजनेतून गॅस कनेक्‍शन मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आले. आज घडीला जिल्ह्यात गॅसधारकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. दरम्यान दरवेळी होणाऱ्या सिलिंडरच्या दरवाढीने ग्राहकांवर मोठा बोजा पडत असून सर्वासामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
केंद्र सरकारने सिलिंडर दरवाढीचा सपाटा लावला आहे. गेल्या चार महिन्यांपासून दरमहिन्याला सिलिंडरची दरवाढ होत आहे. ऑगस्ट महिन्यात 14.2 किलोचे घरगुती सिलिंडरचे दर 105 रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये 50 रुपये तर ऑक्‍टोबरमध्ये 76.50 रुपयांनी दर वाढले. आता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलिंडरचे दर 76 रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. 19 किलोचे व्यावसायिक सिलिंडरही 119 रुपयांनी महागले आहेत. गेल्या चार महिन्यांत 194 रुपयांची वाढ झाली आहे. हे सिलिंडर 1 हजार 320 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे
चहा टपरी, खाद्यपदार्थ विक्रेते व रस्त्यावर लहानमोठी दुकाने चालवून रोजगार करणाऱ्या व्यावसायिकांनासुद्धा फटका बसला आहे.
उज्ज्वला योजनेमागे अंधार
दारिद्य्र रेषेखालील महिलांना चुलीपासून मुक्त करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना आणली. अनेकांनी शंभर रुपये देऊन पहिल्यांदा सिलिंडर घेतले. मात्र त्यानंतर ते शोभेची वस्तू बनले. 283 रुपयांच्या अनुदानातही घट झाली असून सध्या ते 226 रुपयांवर आले आहे. गॅस कनेक्‍शन देऊन सरकारने केरोसीन पुरवठा बंद केला. गरिबांना गॅस सिलिंडर वापरणे डोईजड झाल्याने परत ग्रामीण भागात चुली पेटू लागल्या आहेत.
गेल्या चार महिन्यांतील दर
सलग चार महिन्यांपासून सिलिंडर दरवाढ सुरू असून ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान 105 रुपयांनी सिलिंडर महागले. विधानसभा निवडणुका संपत नाही तोच सिलिंडरच्या किमतीत 76 रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन दर 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जुलैमध्ये शंभर रुपयांनी विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर कमी झाले. त्यामुळे जुलैत 684 रुपयांना विनाअनुदानित गॅस सिलिंडर उपलब्ध झाले. ऑगस्टमध्ये 621, सप्टेंबरमध्ये 637.50; तर ऑक्‍टोबर महिन्यात 650 रुपये दर होते. यामध्ये आता 76 रुपयांनी वाढ झाल्याने हा आकडा 726 रुपयांवर पोहोचला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com